एकनाथ शिंदे फक्त सहीपुरते मंत्री, ते शिवसेनेला कंटाळले; राणेंचं मोठं वक्तव्य

एकनाथ शिंदे फक्त सहीपुरते मंत्री, ते शिवसेनेला कंटाळले; राणेंचं मोठं वक्तव्य

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेला (Shivsena) कंटाळले असून ते केवळ सहीपुरते मंत्री राहिले आहेत, असं मोठं वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला. नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा (Jan Ashirwad Yatra) आजचा तिसरा दिवस असून नालासोपारा येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

नारायण राणे यांची आज वसई-विरारमध्ये जन आशीर्वाद यात्रा होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. “एकनाथ शिंदे जरी नगरविकास मंत्री असले तरी ते केवळ सहीपुरते आहेत. एकनाथ शिंदे मातोश्रीशिवाय एकही फाईल सही करु शकत नाहीत. त्यामुळे ते बिचारे कंटाळलेत. अडचणीत सापडल्यासारखं आहे. मार्ग शोधत आहेत. एक दिवस फोन करेन आणि मार्ग दाखवेन,” असं वक्तव्य राणे यांनी केलं. पुढे राणे यांना तुमच्याकडे येणार आहेत का असा प्रश्न केला असता आले तर घेऊन टाकू आम्ही, असं देखील राणे म्हणाले.

नीलम गोऱ्हेंवर जोरदार निशाणा

शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी नारायण राणे यांच्या यात्रेवर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना राणे यांनी नीलम गोऱ्हे यांना जोरदार टोला लगावला. आमदार नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेतं आणलं. त्यांच्या आमदारकीसाठी मी प्रयत्न केले. आता त्यांची त्यांच्याच पक्षात किती फरफट होत आहे, ते पहा म्हणावं, असं राणे म्हणाले.

मनसे-भाजप युती झाली तर आनंदच

राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीवाद अधिक वाढला, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर राणेंना विचारण्यात आलं. तेव्हा मी राज ठाकरे यांचा मुद्दा खोडत नाही असं म्हणत एकप्रकारे त्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं. पुढे त्यांना मनसे-भाजप युतीबद्दल विचारण्यात आलं असता मनसे आणि भाजपा मैत्री झाली पाहिजे. ही युती झाली तर त्याचा आनंदच असेल, असंही ते म्हणाले.

 

First Published on: August 21, 2021 5:14 PM
Exit mobile version