जायखेडा : कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला ३२ वर

जायखेडा : कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला ३२ वर

रॅपीड अँटीजेन टेस्ट

बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ३६ व्यक्तींनी मालेगाव येथे खासगी तपासणी केली होती. यांपैकी ३३ व्यक्ती निगेटिव्ह आले असून तर ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच नाशिक येथे वैयक्तिकरित्या उपचारासाठी गेलेल्या १ व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करून त्यांना विलगीकरण केंद्रात पाठवण्याच्या तयारीत आरोग्य विभाग लागले आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कळत-नकळत संपर्कात आलेल्या व्यक्तींचे धाबे दणाणले असून, करोनाच्या भितीने अनेकजण स्वतःहून पुढाकार घेत आपल्या चाचण्या करून घेत आहेत. यात अनेकजण प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह आल्याने, कुटुंबिय व संपर्कातील व्यक्तींनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तर काहींचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने काळजी वाढली आहे.

जायखेडा येथील कोरोनाबाधित वाहनचालकाच्या संपर्कात आलेल्या पहिल्या १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर यांच्या संपर्कातील बुधवारी ३२ व्यक्तींचे अहवाल एकाचवेळी पॉझिटिव्ह आले. यानंतर ३२ कोरोनाबाधितांच्या संपर्कातील जायखेडा, जयपूर, वाडीपिसोळ, सोमपूर, ताहराबाद येथील जवळपास १६ रुग्णांना अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात तातडीने हलवण्यात आले आहे.

आमदार बोरसेंचा समाजमाध्यमांतून खुलासा

जायखेडा येथील मृत तरुण हा बागलाणचे आमदार दिलीप बोरसेंचा कार्यकर्ता असल्याने त्याच्या अंत्यविधीसाठी आ. बोरसे कुटुंबियांसह सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते. मात्र, नंतर मृताचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने उपस्थितांच्या मनात धडकी भरली होती. आमदारांच्या उपस्थितीमुळे शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, आ. बोरसे यांनी होम क्वारंटाईन होत आपल्या जवळच्या २३ व्यक्तींचे स्वॅब खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. सुदैवाने या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने संबंधितानी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, उलट-सुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यासंदर्भात आ. दिलीप बोरसे यांनी समाजमाध्यमांतून खुलासा केला आहे.

First Published on: June 18, 2020 8:56 PM
Exit mobile version