रात्रभर संपर्क साधून जयंत पाटील यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा, प्रवासादरम्यानही अधिकाऱ्यांशी चर्चा

रात्रभर संपर्क साधून जयंत पाटील यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा, प्रवासादरम्यानही अधिकाऱ्यांशी चर्चा

मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे संपूर्ण रात्रभर अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्कात राहून सांगली, कोल्हापूर आणि सातारा भागातील पूरपरिस्थितीचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला आहे. दरम्यान आज सकाळी पुण्यातील नियोजित कार्यक्रम उरकून जनतेच्या चिंतेने जयंतराव पाटील सांगलीत दाखल झाले आहेत. आज पुण्यात नियोजित कार्यक्रम सुरू असतानाही आणि कार्यक्रम संपल्यानंतर सांगलीकडे रवाना होताना गाडीतही जयंत पाटील हे सांगली, कोल्हापूर, सातारा या विभागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेताना नियोजन कसे करायचे याची चर्चा अधिकार्‍यांशी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ५९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात १५४.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कृष्णा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने सांगलीकरांवर पुन्हा एकदा २०१९ च्या महापुराचे सावट निर्माण झाले आहे याच चिंतेने मंत्री जयंत पाटील यांनी परिस्थितीची माहिती घेतली.

पश्चिम महाराष्ट्रातील २०१९ चा पूर आठवला की अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. जयंत पाटील यांनी म्हटल आहे की, पश्चिम महाराष्ट्रातील पूराचा धोका टाळण्यासाठी कालपासूनच प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. काल संध्याकाळपासूनच अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत आहे. धरणांच्या पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन केले जात आहे तसेच पूरनियंत्रणासाठी कठोर उपाययोजनाही केल्या जात आहेत असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

First Published on: July 23, 2021 10:06 PM
Exit mobile version