Video: पत्नीला व्हिडिओ कॉल लावून मूकबधीर तरुणाने जयंत पाटलांना सांगितली समस्या

Video: पत्नीला व्हिडिओ कॉल लावून मूकबधीर तरुणाने जयंत पाटलांना सांगितली समस्या

जयंत पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे ऐकली समस्या

इच्छा असते तिथे मार्ग निघतो, याचे उदाहरण सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्यात आज पाहायला मिळाले. इस्लामपूरच्या रेठरे हरणाक्ष या गावातील हसन हकीम या तरुणाचे घर मागच्यावर्षीच्या पुरात वाहून गेले होते. सरकारकडून मिळालेली मदत तुटपुंजी होती. घर कसे उभे करणार? या विवंचनेत असलेल्या हसनने जयंत पाटील यांना गाठले. मात्र मूकबधिर असलेल्या हसनला आपली समस्या काही सांगता येईना, मग त्याने आपल्या पत्नीला व्हिडिओ करुन तिच्यामार्फत आपले गाऱ्हाने पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडले. जयंत पाटील यांनी देखील शांतपणे हसनची पत्नीचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्याला समस्येचे निराकरण करण्याचे निर्देश दिले.

 

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील इस्लामपूर मतदारासंघाचे प्रतिनिधित्व करतात. याच मतदारसंघातील रेठरे हरणाक्ष या गावातील रहिवासी आणि मूकबधिर असलेला हसन हकीम आपली समस्या घेऊन पाटील यांच्याकडे आला होता. त्याचे घर पूर्णपणे पडलेले असल्याने त्याला मदत म्हणून मिळालेली ९५ हजारांची रक्कम ही कमी पडत असल्याचे पत्नीने सांगितले. त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेतून मदत देण्यासंबंधी पाटील यांनी चाचपणी केली. तसेच प्रकरणाची तपासणी करुन तात्काळ गटविकास अधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी यांना सुचना दिल्या.

२०१९ साली कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक तालुक्यातील घर आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्याची प्रक्रिया अद्याप सुरु आहे.

First Published on: March 9, 2020 11:11 PM
Exit mobile version