धरणाच्या पाण्यामुळे निळवंडे परिसर नक्कीच सुजलाम सुफलाम होईल, जयंत पाटलांचा विश्वास

धरणाच्या पाण्यामुळे निळवंडे परिसर नक्कीच सुजलाम सुफलाम होईल, जयंत पाटलांचा विश्वास

अहमदनगर – गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम ठप्प पडले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जयंत पाटील यांनी भरीव निधी देत या धरणाच्या कामाला गती देण्याचे काम अडीच वर्षात केले. आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना या कामाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

निळवंडे धरणातून राहुरी तालुक्यातील विविध गावांना पाणी मिळावे यासाठी निंभेरे गावात तयार करण्यात आलेल्या बोगद्याचे कामही पूर्ण झाले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार किरण लहामटे यांनी या कामात सातत्याने पाठपुरावा केल्याने हे शक्य झाले. त्यामुळे या पाण्यामुळे हा परिसर नक्कीच सुजलाम सुफलाम होईल अशी खात्री जयंत पाटील यावेळी व्यक्त केली.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामाला गती देण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल व धरणाच्या कालव्यांचे काम पूर्णत्वास नेल्याबद्दल आज राहुरी तालुक्याच्यावतीने माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल जयंत पाटील यांनी राहुरीकरांचे आभार मानले.

राहुरी तालुक्याला पाणी मिळावे हे अनेक वर्षांपासूनचे राहुरीकरांचे स्वप्न आहे. या स्वप्नासाठी अनेकांनी खास्ता खाल्ल्या आहेत. ते स्वप्न आता पूर्णत्वास आले आहे. शेतकऱ्यांनी या पाण्याचा नियोजित वापर करावा. ऊसासोबतच इतर पिकांची लागवड करत शेती व्यवसाय वृद्धिंगत करावा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

निळवंडे कृती समितीचे पदाधिकारी, माजी खासदार प्रसादराव तनपुरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार किरण लहामटे यांच्या पाठपुराव्याचे हे यश आहे. आम्ही हे काम एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आणून ठेवले आहे. सध्याचे सरकार हे काम जलद गतीने पुढे नेईल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राहुरीकरांनी प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने एक कार्यतत्पर आमदार निवडला आहे. राज्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. सत्तेत असताना त्यांनी अनेक विकास कामे केली आहेत. सत्ता येते जाते मात्र तुमच्या कार्यशील प्राजक्त दादांना नेहमी साथ द्या, ताकद द्या असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

First Published on: August 12, 2022 7:41 PM
Exit mobile version