ज्यांना आम्ही कागदी वाघ समजायचो ते खरे वाघ निघाले – जयंत पाटील

ज्यांना आम्ही कागदी वाघ समजायचो ते खरे वाघ निघाले – जयंत पाटील

जयंत पाटील

शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर मागील पाच वर्षात टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता शिवसेनेची स्तुती करू लागले आहेत. याचाच प्रत्यय आज पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी नागपूर येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना शिवसेनेची आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्तुती केली आहे. विरोधात असताना आम्ही शिवसेनेवर फार टीका केली नाही पण आम्ही ज्यांना कागदी वाघ समजायचो ते खरे वाघ निघाले असे जयंत पाटील यावेळी म्हणालेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सरकारमध्ये काम करण्याचा तुमचा अनुभव कसा आहे असे जयंत पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले आधी आम्ही कधी उद्धव ठाकरे यांचे काम पाहिले नव्हते पण आता त्यांच्यासोबत काम करतोय त्यामुळे ते कशा पद्धतीने उत्तम काम करू शकतात याचा अनुभव येत असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे देखील कौतुक केले.

अन उद्धव ठाकरेंचे जयंत पाटलांना आठ वेळा फोन –

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवसाबद्दल पत्रकारांनी विचारले असता आदल्या दिवशी रात्री मी तीन वाजेपर्यंत मोबाईलवर एक सिरीयल पाहत होतो मात्र सकाळी उठल्यावर मी पाहिले तर माझ्या फोन वर आठ मिसकॉल होते. मोबाईल व्हायब्रेट मोडवर असल्याने मला ते फोन कळले नाही पण जेव्हा पाहीले तेव्हा ते उद्धव ठाकरेंचे फोन असल्याचे त्यांनी पत्रकराशी गप्पा मारताना सांगितले. दरम्यान त्यांनी यावेळी अधिक बोलणे मात्र टाळले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर भाजपने क्लिनचिट दिली तेच फडणवीस आता सभागृहात अजित दादांना मिळालेल्या क्लिनचिटवर बोलत आहे. मात्र
भाजपला आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना अजित दादांवर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही असे देखील ते यावेळी म्हणालेत.

भाजपने चाळणी लावली असती तर ही वेळ नसती –

जयंत पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही नेत्यांबद्दल विचारले असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:चा गट निर्माण करण्यासाठी दुसऱ्या पक्षाचे लोक घेतले पण भाजपमध्ये येणारे लोक कशा प्रवृतीचे आहेत याचा मात्र त्यांनी विचार केला नसल्याचे सांगत पक्षात घेताना चाळणी लावली असती तर ही वेळ आली नसती असे देखील जयंत पाटील यांनी सांगितले.

First Published on: December 21, 2019 12:51 PM
Exit mobile version