मोदींना दिल्लीत बसून ‘हुकूमशाहीचा’ रोग लागला, जयंत पाटलांचे टिकास्त्र

मोदींना दिल्लीत बसून ‘हुकूमशाहीचा’ रोग लागला, जयंत पाटलांचे टिकास्त्र
करंजा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना प्रदेशाध्यक्षांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत बसून हुकूमशाहीचा रोग लागला आहे. म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. इकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात राज्य सरकारने इंधनावर कर कपात करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत. केंद्र सरकारने अजूनही राज्याच्या जीएसटीचा परतावा दिलेला नाही. त्यामुळे फडणवीसांनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा त्यांनी मोदींनाच सांगावं, ‘मोदीजी हे वागणं बरं नव्हं!” राष्ट्रवादी परिवारसंवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी कारंजा विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक घेतली. कारंजा येथील आढावा बैठकीत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एक चांगला आढावा सादर केला तसेच पक्षासाठी काही सूचना केल्या. या सुचनांचा पक्षाच्या स्तरावर नक्कीच विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्षांनी दिली.
“पेट्रोलचे दर शंभरीच्या नजीक आले आहेत. आपल्या देशाच्या अर्थमंत्री प्रचंड विद्वान आहेत. ‘पेट्रोलवर कर लावा आणि महसूल जमवा’ हेच केंद्र सरकारचे धोरण झाले आहे”, असाही आरोप प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केला.
यावेळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार अमोल मिटकरी, मा. आ. प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, प्रकाश डहाके, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
First Published on: February 6, 2021 8:29 PM
Exit mobile version