जायखेडा शहर कोरोना हॉटस्पॉट; नवीन २७ संशयित

जायखेडा शहर कोरोना हॉटस्पॉट; नवीन २७ संशयित

कोरोनाग्रस्त मृत वाहनचालकाच्या संपर्कात आलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा ४६ वर पोहोचला आहे. जायखेडा शहर कोरोना ‘हॉटस्पॉट’ झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आता २७ व्यक्तींच्या अहवालाकडे जायखेड्यासह संपूर्ण बागलाण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील मोसम खोर्‍यातील जायखेडा, ताहराबाद, सोमपूर, जयपूर (मेंढीपाडे), आमोदे, वाडीपिसोळ, तसेच आरम खोर्‍यातील मुंजवाड येथील आजवर एकूण ४६ व्यक्ती मयत वाहनचालकाच्या संपर्कात आल्याने यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी ४४ करोनाबाधित रुग्ण अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर उर्वरित दोन करोनाबाधितांना चांदवड व नाशिक येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे. त्या ३२ करोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २७ अजमेर सौंदाणे येथील कोविड सेंटरमध्ये क्वांरटाईन करण्यात आले आहे. या व्यक्तींचे स्वॅब शुक्रवारी (दि. १९) घेण्यात आले. सध्या त्यांच्या संपर्कात येणार्‍यांची नोंद घेत तपासणी सुरू आहे. अनेकांना होम क्वांरटाईन केले आहे.

१७ जून रोजी बागलाण तालुक्यातील जायखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रेड झोनमधून आलेल्या १२ जणांचे तर ताहराबाद, मुंजवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आलेल्या १५ अशा एकूण २७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव यांनी दिली आहे. मोसम खोर्‍यातील जायखेडा, ताहराबाद, आमोदे, सोमपूर. जयपूर (मेंढीपाडे), वाडीपिसोळ, मुंजवाड या गावांत कोरोना प्रतिबंधासाठी स्थानिक ग्रामप्रशासन व आरोग्य यंत्रणेने दक्ष राहण्याचे आवाहन डॉ. अहिरराव यांनी केले आहे.

First Published on: June 19, 2020 9:26 PM
Exit mobile version