गिरणी कामगारांना ७५ हजार घरे देणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन

गिरणी कामगारांना ७५ हजार घरे देणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन

गिरणी कामगारांना येत्या सहा महिने ते दोन वर्षात एमएमआरडीए क्षेत्रात ३०० ते ४५० चौरस फूटांची ७५ हजार घरे देण्यात येतील. यापैकी काही घरेही तयार आहेत. या घरांच्या किंमती परवडणा-या असतील, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिले.

गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आव्हाड यांनी वरील आश्वासन दिले. तयार घरांची पहाणी कामगार संघटनांनी करावी. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना ही घरे पहाण्याची व्यवस्था येत्या चार दिवसात म्हाडाने करावी, असे निर्देश आव्हाड यांनी यावेळी म्हाडाला दिले. ही घरे गिरणी कामगरांच्या पसंतीस उतरली तर या घरांच्या किंमती कामगार संघटनाना विश्वासात घेऊन ठरविली जाईल आणि ती किंमत कमीत कमी असतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

जे निकष गिरणी कामगारांच्या घरासाठी आहेत तेच निकष एमएमआरडीए क्षेत्रातील घरांना राहतील. त्यात कुठलाही बदल होणार नाही, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्याशिवाय एमएमआरडीएची तयार घरे आणि कोनगावची सोडत काढलेली घरे ही गिरणी कामगारांना लवकरात लवकर देण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

गिरणी कामगारांच्या या घरांचा प्रस्ताव आणि ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार आयोजित केली आहे. गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावी आणि हा प्रश्न लवकरात मार्गी लागावा म्हणून हा प्रस्ताव तयार केल्याचे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला गिरणी कामगार कृती संघटनेच्या जयश्री खाडीलकर-पांडे, जयप्रकाश भिलारे, प्रवीण घाग, निवृत्ती देसाई, नंदू पारकर, बजरंग चव्हाण, प्रवीण येरुणकर, हेमंत गोसावी तसेच सर्व श्रमिक संघटनेचे उदय भट. बी. के. आम्ब्रे, संतोष मोरे, निवारा संघटनेचे हेमंत राऊळ उपस्थित होते.


हेही वाचा : पाच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळणार, एमटीडीसी आणि खासगी विकासकांमध्ये करार


 

First Published on: May 19, 2022 8:43 PM
Exit mobile version