गनिमी कावा करत आरेमध्ये घुसलेल्या जितेंद्र आव्हाडांना अटक

गनिमी कावा करत आरेमध्ये घुसलेल्या जितेंद्र आव्हाडांना अटक

आरे वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना अटक

मुंबई हायकोर्टाने पर्यावरणवाद्यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर काल रात्रीपासून आरेमध्ये वृक्षतोड करण्याची सुरुवात झाली. यानंतर पर्यावरणप्रेमींनी तीव्र आंदोलनाला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वृक्षतोडीचा निषेध करताना थेट आरेमध्येच शिरकाव केला. सरकारने तोडलेले प्रत्येक झाड आमदाराला फासावर लटकवेल, अशी संतप्त प्रतिक्रिया आव्हाड यांनी यावेळी दिली. तब्बल अडीच तासांची पायपीट करुन आव्हाड गनिमी कावा करत झाडे तोडलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

जितेंद्र आव्हाड यांनी सकाळीच ट्विटरवर एक व्हिडिओ प्रदर्शित करत सरकारच्या निर्णयावर टीका केली होती. त्यानंतर मी आरेमध्ये जाणार अशी घोषणा देखील केली. मात्र पोलिसांनी आरे परिसराला छावणीचे स्वरुप दिले होते. आरेमध्ये जाणाऱ्या सर्व वाटांवर पोलिसांनी चौक्या लावून आंदोलकांना दूर ठेवले होते. त्यामुळेच आव्हाड यांनी गनिमी कावा करत पायीच जाण्याचा निर्णय घेतला. जंगल, वस्त्या ओलांडून तब्बल अडीच तासांचा प्रवास करत आव्हाड झाडे कापल्याच्या ठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत काही निवडक कार्यकर्ते होते.

हायकोर्टाच्या निकालानंतर एका रात्रीत शेकडो झाडे कापण्यात आली आहेत. त्यानंतर उसळलेल्या आंदोलनात २९ आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आंदोलकांना बोरीवली कोर्टात सादर केल्यानंतर सोमवारपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

First Published on: October 5, 2019 7:01 PM
Exit mobile version