ईडीच्या मुंबई विभागाचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली

ईडीच्या मुंबई विभागाचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली

ईडीच्या मुंबई विभागाचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली करण्यात आली आहे. सत्यव्रत कुमार यांच्याकडे अनेक मोठ्या प्रकरणांचा तपास आहे. ईडीच्या कारवाईमुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं असताना सत्यव्रत कुमार यांची बदली करण्यात आली.

सत्यव्रत कुमार हे कस्टम आणि केंद्रीय अबकारी विभागातून ईडीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढवण्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाने कार्मिक विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावाल मंजूरी देण्यापूर्वी केंद्रीय दक्षता आयोगाची मान्यता घ्यावी लागते. परंतु, केंद्रीय दक्षता आयोगाच्या अध्यक्षांच्या समितीने हा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ विभागात परत जावं लागणार आहे. दरम्यान, आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार हे पाहावं लागेल.

सत्यव्रत कुमार अनेक मोठ्या प्रकरणांचा तपास करत होते. मात्र, आता त्यांच्या बदलीनंतर त्यांच्याकडून सर्व प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला आहे. कोणत्याही नवीन प्रकरणांचा तपास त्यांच्याकडे दिला जाऊ नये असं आदेशात म्हटलं आहे. आता त्यांच्याकडे केवळ कोल ब्लॉक प्रकरणांचा तपास असणार आहे. गेली ७ वर्षे सत्यव्रत कुमार अंमलबजावणी संचनालयात कार्यरत होते. सामान्यत: एवढया प्रदीर्घ कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर अधिकारी ठेवले जात नसल्याने यापुढे अधिक कालावधीसाठी प्रतिनियुक्तीला मंजुरी देण्यास केंद्रीय दक्षता आयोगाने मान्यता दिलेली नाही, असं समजते.

First Published on: September 29, 2021 1:00 PM
Exit mobile version