कल्याण ते नाशिक लोकल रेल्वेसेवा ऑक्टोबरपासून

नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला जोडणारी लोकल रेल्वेसेवा सुरू होणार असून, ताशी ५० किमी वेग असणारी ही लोकल येत्या ऑक्टोबरपर्यंत नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे. दिल्लीच्या मेट्रोसारख्या सुखसोयी या ट्रेनमध्ये असणार आहे.

तात्कालीन रेल्वेमंत्र्यांनी दाखवला होता हिरवा कंदील –

नाशिक ते मुंबई प्रवासासाठी अनेक रेल्वेगाड्या आहेत. मात्र, या गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबत नाहीत. अनेक प्रवाशांना काही मुख्य स्टेशनवर उतरून लहान स्टेशनवर जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या जनतेसाठी रेल्वे विभागाकडे कसारा ते नाशिक लोकलची मागणी केली होती. मात्र, कसारा ते नाशिक लोकल सुरू केल्यास ही लोकल तोट्यात जाईल, असा निकष रेल्वेने काढला होता. म्हणून रेल्वे बोर्डाने या गोष्टीचा अभ्यास करून रेल्वे अधिकारी, प्रवासी यांच्याकडून सूचना मागवल्या होत्या. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेला हिरवा कंदील दाखवला होता.

नाशिककर वाट पाहत आहेत –

नाशिककरांच्या सेवेत ही लोकल ऑक्टोबरमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत रेल्वेच्या सूत्रांनी दिले आहेत. डीएमयू (डिझेल मल्टिपर्पज युनिट) वर चालणारी ही लोकल कालांतराने ईएमयू (इलेक्ट्रिकल मल्टिपर्पज युनिट) वर सुरू करणार आहे. ही लोकल लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी नाशिककर आतुरतेने वाट पाहत आहेत. कल्याण ते नाशिक दरम्यान येणाऱ्या स्थानकांना लोकलमुळे लाभ मिळणार असून, नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

असा असेल लोकल प्रवास –

१२ डब्यांची ही लोकल कल्याण ते नाशिक दरम्यान १५ स्टेशनवर थांबणार आहे. १३५ किलोमीटरचे अंतर असणाऱ्या या लोकलचा ताशी वेग ५० किलोमीटर असेल. कसारा ते इगतपुरीदरम्यान सहा बोगदे असून, प्रत्येक बोगदा १५ ते २० सेकंदांत पार होणार आहे. मेट्रोच्या धर्तीवर असणाऱ्या या लोकलच्या एका डब्याला चार दरवाजे असतील. विशेष म्हणजे पुढील स्टेशनचे विवरण नकाशाद्वारे दाखवले जाणार आहे.

First Published on: May 23, 2018 8:18 AM
Exit mobile version