Karnataka Election 2023 : निकालानंतर बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर भाजप समर्थकांचा हल्ला

Karnataka Election 2023 : निकालानंतर बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर भाजप समर्थकांचा हल्ला

 

कर्नाटकः कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले तर भाजपचा दारुण पराभव झाला आहे. या निकालानंतर बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर भाजप समर्थकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार सुधा भातखांडे यांच्या घरावर भाजप समर्थकांनी हल्ला केला. या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. बेळागावमध्ये विधानसभेच्या एकूण १८ जागा आहेत. यांपैकी एकाही जागेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निवडून आलेला नाही.

या निवडणुकीत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपने विरोधात प्रचार केल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडून आला नाही, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तुम्ही बेळगावमधील मराठी माणसांच्याविरोधात प्रचार केलात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केलेला भाजपचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधात प्रचार केल्यानेच महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही आमदार निवडून आलेला नाही. याचे खापर मी फडणवीस यांच्यावरच फोडतो, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.

संजय राऊत म्हणाले, बजरंगबली सत्याच्या बाजूने उभा राहिला आहे. कर्नाटक विजयाची गदा राहुल गांधी यांच्या हाती आहे. राहुल गांधी हे २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असू शकतात. आम्ही सर्व एकत्र आहोत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे. कर्नाटकामध्ये झालेला सत्ता बदल हा केंद्रातील भाजप सरकार जाणार यांची नांदी आहे. परिणामी कर्नाटक जनतेचे आभार मानायलाच हवेत.

ईडी, सीबीआय, आयटी अशा भाजपच्या धमक्यांना न जुमानता कॉंग्रेस कर्नाटकमध्ये निवडणुकांसमोरे गेली. त्यामुळे कॉंग्रेसचा विजय झाला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात कर्नाटक निकालाचा महाराष्ट्र आणि देशावर परिणाम होणार नाही. मात्र देखणा हिरा भंगला, अशी फडणवीस यांची अवस्था झाली आहे. मी पैजेवर सांगतो की कर्नाटक निकालाचा महाराष्ट्र आणि देशावर नक्कीच परिणाम होणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

First Published on: May 13, 2023 8:42 PM
Exit mobile version