कर्नाटक सरकारचा उलटा कारभार : भुजबळ

कर्नाटक सरकारचा उलटा कारभार : भुजबळ

नाशिक : बेळगाव, कारवार राहिले बाजूला आणि ते जत, अक्कलकोट मागायला लागले आहेत. मी बेळगाव, कारवारला गेलो त्यावेळी सहा-सात लोकांचे बळी गेले. तो प्रसंग आजही आठवल्यावर अंगावर शहारे येतात. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाप्रश्नी सध्या जे राजकारण सुरू आहे, त्यावरून असे दिसते की कर्नाटक सरकारची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंवर सडकून टिका केली.

भुजबळ फार्म येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील सध्याच्या वातावरणावर भुजबळांनी भूमिका मांडली. त्याबरोबरच महाराष्ट्र-कर्नाटक वादाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, सद्यस्थितीत अहमदाबादमध्ये जेवढे गुजराती नाहीत, तेवढे मुंबईत वास्तव्य करतात. बेंगळुरूमध्ये जेवढे कन्नड भाषिक नाहीत, तेवढे मुंबईत आहेत. पाटणामध्ये जेवढे हिंदी भाषिक नाहीत, तेवढे मुंबईत आहेत. मग तिकडचाही विकास केला पाहिजे, असा खोचक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यात वाढत असलेल्या महागाईवर, कर्नाटक सीमावाद अशा प्रश्नांवर आंदोलन होत आहेत. या पार्श्वभूमीवर 17 तारखेला महाविकास आघाडीचा मोर्चा असल्याचे ते म्हणाले. कर्नाटक सीमावादात अमित शहा घेत असलेल्या बैठकीत फार मोठा दिलासा मिळेल, असे वाटत नाही असेही ते म्हणाले.

सत्ताधार्‍यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये सुरू आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे लाड बोलले. त्यांनी तर आमचा इतिहासच बदलून टाकल्याचे भुजबळ म्हणाले. त्याचबरोबर सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या, उद्धव ठाकरे त्यांच्याबाबत काय तो निर्णय घेतील, समज देतील, असे वाटते. मात्र, त्या नेमके काय बोलल्या मला माहित नाही, वारकर्‍यांनी त्यांना विरोध केल्याचे समजते. तसेच ग्रामपंचायत निवडणुकांवर बोलताना नितेश राणे नेमके काय बोलले, काय झाले मला माहित नाही, त्यामुळे त्यावर बोलणार नसल्याचे ते म्हणाले.

हाफ पॅन्टची फुल झाली पण, पोलिसांचा जरब कमी झाला

आम्ही लहान होतो, हाप पॅन्ट निळ्या कोटवाले पोलीस वाडीत आले की आम्ही पळत सुटायचो. कुठे आले, काय आले अशी चौकशी व्हायची, पण जरब होता. आता हाफ पॅन्टची फूल पॅन्ट झाली पण जरब कमी झाला, असा टोला भुजबळ यांनी लगावला. यावेळी भुजबळ म्हणाले, पोलिसांची जितकी जबाबदारी आहे तितकीच जबाबदारी नागरिकांचीदेखील आहे. पण असे आहे की, लोकांना नोकर्‍या नाहीत. बेरोजगारी वाढली. त्यामुळे संपूर्ण देशात गुन्हेगारी वाढली. तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याने सर्वांनीच काळजी घ्यायला पाहिजे. इतर देशात गुन्हेगारी नाही, असे नाही. पण, गुन्हेगारी तिथे वेगळ्या पद्धतीची आहे. स्व. वसंतराव पवार यांच्या कन्येवर हल्ला झाला. त्याबाबत पोलीस तपास करत आहेत. पण याकडे पोलिसांनी अधिक लक्ष दिले पाहिजे. मीही स्वतः पोलीस डिपार्टमेंट सांभाळले आहे. त्यामुळे याची माहिती आहे, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

First Published on: December 15, 2022 11:00 AM
Exit mobile version