रोजंदारी मजूरांना केडीएमसीचा मदतीचा हात

रोजंदारी मजूरांना केडीएमसीचा मदतीचा हात

कोरोना पार्श्‍वभूमीवर शासनाने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. अशा परिस्थितीत रोजंदारीवर काम करणारे मजूर, नाका कामगार व बांधकाम मजूर यास उदरनिर्वाहाचे काही साधन नसल्‍यामुळे पालिकेने सामाजिक संस्थेच्या मदतीने मदतीचा हात दिला आहे. आजपर्यत ३९० मजूरांना रेशनिंग किटचे वाटप करण्यात आले.

राज्‍यात सर्वत्र पसरत चाललेल्‍या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी महापालिका प्रशासन जीवनावश्‍यक सेवा, सुरळीत ठेवण्‍यासाठी अथक प्रयत्‍न करीत आहे. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रोजंदारीवरील मजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली महापालिकेचे मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी सत्‍यवान उबाळे यांनी जैन सोसायटी, रोटरी क्‍लब, रिलायन्‍स फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्‍हींग फाउंडेशन या संस्‍थांच्‍या माध्‍यमातून आजपर्यंत सुमारे ३९० रेशनिंग किटचे वाटप सर्व प्रभाग क्षेत्रातील नाका कामगार, बांधकाम कामगार, स्‍थलांतरीत मजूर यांना प्रभागक्षेत्र अधिकारी यांचेमार्फत देण्यात आले. त्‍याचप्रमाणे पदपथावरील बेघर,बेवारस तसेच भिकारी यांनाही २३ मार्चपासून आतापर्यंत ७३७५ फुड पॅकेटचे वितरण प्रभागक्षेत्र अधिकारी यांचेमार्फत करण्‍यात आले. संचार बंदीचे काळात स्‍थलांतरीत मजूर, नाका कामगार, बांधकाम कामगार, बेघर, भिकारी व बेवारस यांची गैरसोय होवू नये म्‍हणून अशाप्रकारे फुट पॅकेटचे व रेशनिंग किटचे वितरण यापुढेही  करण्‍यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले.
First Published on: March 30, 2020 8:55 PM
Exit mobile version