मुक्त विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत खडाजंगी

मुक्त विद्यापीठ व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत खडाजंगी

नाशिक : ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत शैक्षणिक निर्णयाऐवजी कंत्राटी कामांवरूनच खडाजंगी झाली. बीओएमच्या (व्यवस्थापन मंडळ) सदस्यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील हे बैठकीला ऑनलाइन नव्हे तर प्रत्यक्षात उपस्थित असावे, त्यांच्या कार्यकाळातील विद्यापीठात झालेली विविध बांधकामे, दुरुस्तीची कामे, पदभरतीच्या चौकशीची मागणी लावून धरल्याने बराच काळ गोंधळ झाला.
बैठकीत कुलगुरू आणि कुलसचिव दोन्ही पदे प्रभारी असल्याने मंडळाच्या सदस्यांनी प्रभारी अधिकार्‍यांना धारेवर धरले. विद्यापीठ विश्रामगृहाच्या इमारतींसह इतर पाच कोटींची त्यांच्या कार्यकाळातील झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी आमदार सुहास कांदे यांनी लावून धरली. तसेच वित्त अधिकारीपद भरतीवरही नाराजी व्यक्त केली. ऑनलाइनद्वारे कुलगुरू डॉ. पाटील यांनी बैठकीला हजेरी लावत कामांच्या तपासणीस सहमती दर्शविली.

रस्त्यासाठी विद्यापीठाने निधी देण्याची आमदार आहेरांची मागणी

माजी कुलगुरू डॉ. वायुनंदन यांनी मंजूर केलेल्या मुक्त विद्यापीठाकडे जाणार्‍या रस्त्यासाठी 4.50 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी आमदार सरोज आहेर यांनी लावून धरली. कुलगुरू डॉ. पाटील यांनी मात्र ही विद्यापीठाची मालमत्ता नसून ग्रामपंचायतीचा रस्ता आहे. त्यावर खर्च करता येणार नसल्याचे सांगत शासनाकडून निधी मंजूर करून आणावा असे मत व्यक्त केले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सीईओंनी यापूर्वीच हा रस्ता डीपीसीद्वारे करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सहमती दर्शविली होती.

कंत्राटी पदावरूनही वादावादी 

विद्यापीठात कुलगुरूंच्या विशेष अधिकारात 6 महिन्यांसाठी कंत्राटी कर्मचारी नियुक्ती करता येते. जुन्या कर्मचार्‍यांना मुदतवाढही देता येते. पण, विद्यमान कुलगुरूंनी मात्र नव्याने कंत्राटी कर्मचारी नियुक्ती देताना ते कुठे कार्यरत आहेत याची विचारणा करूनच नियुक्ती दिली आहे. अनेकांना यातून घरचा रस्ता दाखविल्याने त्यावरूनही मंडळ सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

मी प्रभारी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या 4 ते 5 कोटींच्या बांधकामांसह विविध कामांच्या चौकशीचा ठराव मांडला आहे. त्याची चौकशी व्हावी. तसेच प्रभारी असले तरीही कुलगुरूंनी आठवड्यातून एकदा तरी विद्यापीठात याव अशी मागणी केली आहे. : आ. सुहास कांदे, सदस्य, बीओएम

कुलगुरूंच्या कार्यकाळातील कामांच्या चौकशीची नव्हे तर नेमकी कामे कुठली झाली याची माहिती सदस्यांनी मागितली होती. आमदार सुहास कांदे यांचेही काही मुद्दे होते. कामांविषयी चौकशीचे सर्वाधिकार कुलगुरूंना आहेत. त्यामुळे याविषयी मुद्दे उपस्थित करुन आमदारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईनचा काही मुद्दा नाही. डॉ. पी.जी. पाटील, प्रभारी कुलगुरु

First Published on: September 1, 2022 6:32 PM
Exit mobile version