झेड प्लस सुरक्षा असलेले सोमय्या बेपत्ता होऊ शकत नाही, गृहमंत्रालयाकडे त्यांचा ठावठिकाणा माहितीये – राष्ट्रवादी

झेड प्लस सुरक्षा असलेले सोमय्या बेपत्ता होऊ शकत नाही, गृहमंत्रालयाकडे त्यांचा ठावठिकाणा माहितीये – राष्ट्रवादी

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने धक्का देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यानंतर सोमय्या पिता-पुत्र फरार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केंद्रीय गृहमंत्रालयावर बोट दाखवलं आहे. किरीट सोमय्या यांना केंद्राची झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे सोमय्या कुठे आहेत याची माहिती गृहमंत्रालयाकडे असते, असं क्लाईड क्रास्टो म्हणाले.

क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयावर देखील बोट दाखवलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “किरीट सोमय्या बेपत्ता असल्याची शहरात चर्चा आहे. पण झेड प्लस सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही. कारण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्याच्या ठावठिकाण्याची माहिती निश्चितपणे असेल. जर किरीटसोमय्या लपत असतील तर तपास यंत्रणांना आवश्यकता असेल तेव्हा माहिती देणे हे गृहमंत्रालयाचे कर्तव्य आहे,” असं क्रास्टो यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

सोमय्यांना न्यायालयाचा धक्का

किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाने सोमवारी या याचिकेवर सुनावणी करताना त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

सोमय्या पिता-पुत्र फरार – संजय राऊत

किरीट सोमय्या हे मुलासह फरार झाले असून न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत, असं शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आहेत. प्रश्न इतकाच आहे की हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोक्सीप्रमाणे पळून तर गेले नाहीत? जामीन होत नाही तोपर्यंत त्यांना लपवण्यात येईल. हे दोघे परदेशातही पळून जाऊ शकतात. त्यामुळे दोघांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

 

First Published on: April 12, 2022 9:36 AM
Exit mobile version