जाणून घ्या क्युसेक म्हणजे काय ?

जाणून घ्या क्युसेक म्हणजे काय ?

नाशिक : सध्या सर्वदूर चांगला पाऊस सुरू आहे. धरणे भरत आहेत. जिल्ह्यातील धरणांतून पाणीही सोडले जात आहे. हे पाणी सोडताना अमूक टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले, असे आपण नेहमी वाचतो. मात्र, या शब्दांचा नेमका अर्थ काय, हे समजत नाही. हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न…
आपल्याला फारतर लिटर ही संज्ञा माहित असते. परंतु, धरणातील पाणीसाठा मोजण्यासाठी व त्यातून सोडण्यात येणारे पाणी मोजण्यासाठी वेगवेगळी परिमाणे वापरली जातात. क्युसेक, क्युमेक, टीएमसीमध्ये पाणीसाठा मोजला जातो. नदीतून वाहणार्‍या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याचा वेग मोजण्यासाठी क्युसेक व क्युमेक ही परिमाणे वापरतात. क्युसेक म्हणजे घनफूट प्रतिसेकंद, तर क्युमेक म्हणजे घनमीटर प्रतिसेकंद. धरणातून एका सेकंदाला किती घनफूट किंवा घनमीटर पाणी वाहते, हे यावरून कळते. या वेगाने पाणी किती वेळ सोडले जाते, त्यावर त्या धरणातून किती पाणी बाहेर पडले हे ठरते. क्युमेकचा वापर आता शासकीय पातळीवर वाढला आहे.

क्युमेक म्हणजे काय ?

क्युमेकमध्ये पाणी घनमीटरमध्ये मोजले जाते. एक क्युमेक पाणी म्हणजे प्रतीसेकंद १००० लीटर्स पाणी. म्हणजेच १००० क्युमेक या प्रमाणात पाणी सोडले जात असेल, तर १००० x १००० असे १० लाख लिटर्स पाणी प्रतीसेकंद या वेगाने नदीपात्रात येत असते.

असे मोजले जाते पाण्याचे एकक

क्युसेक म्हणजे काय ?

धरणातून पाणी सोडतानाचे प्रमाण क्युसेक मध्ये मोजले जाते. एक घनफूट प्रती सेकंद म्हणजे एक क्युब प्रती सेकंद याचा अर्थ क्युसेक असा होतो. एक घनफूट पाणी म्हणजे २८.३१ लिटर पाणी. ज्यावेळी १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो त्यावेळी १००० x २८.३१ म्हणजेच २८ हजार ३१० लिटर पाणी प्रती सेकंदाला नदीपात्रात सोडले जाते. कोणत्याही धरणातून जर २४ तासांत सतत ११,५०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर धरणाची पातळी २४ तासानंतर १ टीएमसीने कमी झालेली असते.

First Published on: July 26, 2022 1:45 PM
Exit mobile version