एका लग्नाची गोष्ट..लग्न फेसबुकवर, आहेर ऑनलाईन आणि ‘पाहुण्यांना न येण्याचं निमंत्रण’!

एका लग्नाची गोष्ट..लग्न फेसबुकवर, आहेर ऑनलाईन आणि ‘पाहुण्यांना न येण्याचं निमंत्रण’!

एरवी नवरा-नवरी ऑनलाईन भेटणं, त्यांचे सूत जुळणं आणि त्यानंतर लग्न होणं ही सामान्य बाब मानली गेली असती. पण सध्याच्या कोरोना लॉकडाऊनच्या काळात सगळेच घरात बसलेले असताना देखील एखादं लग्न ‘ऑनलाईन’ झालं, तर ‘व्हायरल तो होगा ना बॉस’! कोल्हापूरमधल्या अविनाश दोरूगडे आणि रुपाली निर्मळकर यांचं लग्न त्यांनाच नाही कर आख्ख्या पंचक्रोशीला कायम लक्षात राहील असंच झालं. आणि त्याहून लक्षात राहील ती त्यांच्या लग्नाची पत्रिका. कारण इतर पत्रिका पाहुण्यांना लग्नात येण्यासाठी दिल्या जातात, पण यांनी पत्रिका छापली होती ती पाहुणे लग्नाला येऊ नयेत म्हणून!

ऑनलाईन विवाह, पण म्हणजे नक्की काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चपासून देशभर लागू केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ तारखेला पुन्हा ३ मे पर्यंत वाढवला. सर्व प्रकारचे समारंभ रद्द करण्याची वेळ आली. एकत्र जमण्यावर निर्बंधच नाही तर बंदीच आली. पण आपल्या दाम्पत्याचं लग्न ठरलं होतं मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्येच. १५ एप्रिल लग्नाची तारीखही काढून झाली. पण ऐन वेळी कोरोचा विषाणू शिंकला आणि लग्नावर सावट आलं. पण सीआरपीएफचे कोब्रा कमांडो असलेले अविनाश आणि पदवीधर शिक्षण झालेली रुपाली या दोघांनी हा विवाह ऑनलाईन करायचं ठरवलं! पण म्हणजे नक्की काय?

लग्नाला येऊ नका बरं!

तर यांच्या लग्नाच्या पत्रिकेत स्पष्ट लिहिण्यात आलं होतं की ‘हे निमंत्रण न येण्यासाठी आहे’! कोरोनामुळे कुणीही घराबाहेर पडून आमच्या लग्नाला येऊ नये असंच त्यांनी पाहुण्यांना सांगितलं. पण तरीदेखील पाहुण्यांना लग्न पाहाता येणार होतं. कारण घरासमोरच्या मोकळ्या जागेतच घरातल्याच दोन अन् दोन चार लोकांसमवेत या दोघांनी आयुष्याचा इतका महत्त्वाचा क्षण साजरा केला. बरोबर सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी विवाह सोहळा पार पडला. आणि या सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण फेसबुकवरून करण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या पाहुण्यांना लग्नात ‘याची फेसबुकी याची डोळा’ सहभागी होता आलं! पत्रिकेत या फेसबुक सोहळ्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता.

आता आला मुद्दा आहेराचा. पण त्याचीही पद्धतशीर सोय या जोडप्याने करून ठेवली होती. लग्नपत्रिकेत स्पष्ट लिहिलं आहे की ‘आम्ही या शुभप्रसंगी तुमच्या आहेराची/मदतीची अपेक्षा करत आहोत’! पण ती कशी? तर खाली पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी या दोन्ही खात्यांची माहिती देण्यात आली आहे. जो काही आहेर द्यायचा आहे, तो या खात्यांवर ट्रान्सफर करण्याचं आवाहन या पत्रिकेत केलं आहे. शिवाय, हेही अशक्य असेल, तर एखाद्या गरजू कुटुंबाला अन्नदान करा, तोच आमचा आहेर असेल, असं देखील खाली म्हटलं आहे.

खरंतर, या काळामध्ये एकीकडे बेजबाबदारपणे बिनबोभाट रस्त्यावर हिंडणारी लोकं समाजात दिसत असताना दुसरीकडे अविनाश आणि रुपाली या जोडप्यासारखे देखील जबाबदार लोकं आहेत, जे त्यांच्या वैयक्तिक सोहळ्यातून देखील सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून समाजाचं भलं करण्यासाठी आवाहन करतात. एका अनोख्या लग्नाची गोष्ट!

First Published on: April 16, 2020 6:20 PM
Exit mobile version