यंदा कोल्हापूर-सांगलीची पुनरावृत्ती नको – मुख्यमंत्री

यंदा कोल्हापूर-सांगलीची पुनरावृत्ती नको – मुख्यमंत्री

मागील वर्षी सांगली-कोल्हापूरमध्ये महापूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते तसेच यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला होता. याचमुळे गेल्या वर्षी प्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा, अशी सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केली आहे. सध्या आपण कोरोनाचा मुकाबला करीत आहोत. पण येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगले समन्वय ठेऊन काम करा तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक आयोजित केली होती या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, सर्व विभागीय आयुक्त, रेल्वे, नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल, हवामान विभागाचे तसेच मुंबई पालिका आयुक्त व  इतर अधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी हवामान खात्याने यावेळी सादरीकरण केले. त्याचा धागा पकडत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही इतके आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे मात्र तरी देखील पाउस आपले अंदाज चुकवतोच. अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होणे, त्यामुळे वादळ, जोरदार पाउस, ढग फुटी असे काहीही होऊ शकते, त्यामुळे सर्व विभागांनी हवामान विभागाच्या कायम संपर्कात राहावे व चांगला समन्वय ठेवावा असे देखील सांगितले.

विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, त्यांचे खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होणे हे महत्वाचे आहे. पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत. पाण्याचा निचरा करणारे  तेथील पाईप्स मोकळे आहेत का ते पहायला पाहिजे असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शहर  व ग्रामीण भागात कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू नको आणि खड्डे पडले तर तत्काळ बुजवा अशी ताकदी त्यांनी यावेळी दिली तसेच अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात कोविडसाठी विलगीकरण सुविधा केल्याने एनडीआरएफला पर्यायी जागा लगेच द्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली

महापालिका सज्ज

मुंबईत चारशे किमी नाल्यांचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण केले असून तुंबणारे नाले स्वच्छ करण्यात येत आहे. पावसाळ्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याची ग्वाही पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी यावेळी दिली. मुंबईत ३३६ पुराची ठिकाणे आहेत. मिठी नदीच्या सफाईचे ७७ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच हिंदमाता, कलानगर, आणि इतर ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करणार असून उच्च क्षमतेचे पंप्स वापरून पाणी उपसणे शक्य आहे. मुंबईत कुठेही अडचण येणार नाही असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले.

First Published on: May 26, 2020 9:34 PM
Exit mobile version