‘आमी गणपती पुजतो, तुमी मुंबैकच रवा’, चाकरमान्यांना नातेवाईकांचा सल्ला!

‘आमी गणपती पुजतो, तुमी मुंबैकच रवा’, चाकरमान्यांना नातेवाईकांचा सल्ला!

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वांत मोठा उत्सव. एक वेळ मुंबईतील नोकरीसाठी आलेला माणूस मे महिन्यात गावी जाणार नाही. पण गणपतीला गावी जायचा राहणार नाही. त्यामुळे आपला मुलगा, नवरा, पुतण्या गणपतीला गावी येणार असल्याने घरची मंडळी वाटेला डोळे लावून असतात. परंतु मुंबईकरांची मोठ्या चातकाप्रमाणे वाट पाहणारे हे डोळे यंदा मात्र तुम्ही गावाला नाही आलात तरी चालेल याच भावनेने संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दरवर्षी गाडीत केव्हा बसलात.. या आपुलकीच्या स्वराऐवजी यंदा ‘आम्ही गणपती पुजतो. तुमी मुंबैकच रवा आणि काळजी घ्यावा’… असा स्वर प्रत्येक चाकरमन्यांच्या कानावर पडू लागला आहे.

काही झाले तरी गावी जायचेच!

कोरेानाचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावर पडले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने करून सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातच दरवर्षी गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांनाही मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. सरकारच्या नियमानुसार, गावी जाणाऱ्यांना ई-पासची नोंदणी करून गावी जाता येणार असून गावी गेल्यानंतर १४ दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण अर्थात क्वारंटाईन करण्याचा नियम घातला आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे. आधीच लॉक-डाऊनचा कालावधी सुरु आहे. तीन महिन्यांनंतर काही मंडळी कामाला जायला लागली. त्यामुळे १४ दिवसांचे क्वारंटाईन राहण्यासाठी चाकरमान्यांना एक महिन्याची सुट्टी घेऊनच गावी जावे लागणार आहे. तरीही काही चाकरमनी एखादे रिकामे घर किंवा बंगला शोधून क्वारंटाईनची व्यवस्था करत आहेत. काही झाले तरी गणपतीला जायचेच असा निर्धार चाकरमानी करत आहेत.

मात्र, आपल्या घरचे कुणी गावी येतात, याची कुणकुण लागलेल्या नातेवाईकांनी चाकरमान्यांना फोन करायला सुरुवात केली. क्वारंटाईन आणि ई पासच्या झंझटमध्ये पडू नका. आम्ही यंदा काय ता बघतो. गणपती पुजतो आमी. तुमी तुमची काळजी घ्यावा, असेच काही प्रेमाचे सल्ले गावातील नातेवाईकांना मिळू लागले आहेत. मात्र, ज्यांचे गावी कुणीच नाही, त्यांची मोठी गैरसोय झालेली असून त्यांना गणपतीसाठी सर्वप्रकारची दिव्य पार करून जावेच लागणार आहे.

कोकणात कोरोनाबाबत गैरसमज

कोकणात गणपतीनिमित्त गावी जायचे असल्याने तसेच पुढे जाऊन काही क्वारंटाईनची व्यवस्थित जागा उपलब्ध होणार नसल्याने काही कोकणातील लोकांनी आधीच गावी धाव घेतली. या गावी गेलेल्या लोकांच्या सांगितलेल्या अनुभवानुसार कोकणी माणसांमध्ये कोरोनाबाबत मोठा गैरसमज पसरला आहे. क्वारंटाईनमध्ये राहत असलेला प्रत्येक व्यक्ती कोरोना बाधित असल्यासारखीच गावची मंडळी वागत असून क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंरतही ते मुंबईतील आलेल्या लोकांशी तसेच त्यांच्या घरच्यांशी दूर पळत असल्याचे लोकांचे अनुभव आहेत. कोरोना हा हवेतून पसरत असल्याचा एक समज गावातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसून येत आहे.

यंदा गावी येणाऱ्यांची संख्या होणार कमी

गणपतीला गावी जाण्याची तीव्र इच्छा असली तरी आधीच सरकारी ई पास आणि क्वारंटाईनचे दिव्य पार पाडून गावी जाणाऱ्यांना गावच्या मंडळींकडून गावी न येण्याच्याच अप्रत्यक्ष सूचना होत असल्याने गणपतीला गावी जाणाऱ्यांची संख्या यावर्षी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कोरोनाच्या या आजारामुळे मुंबईकर आणि गावाकडील मंडळ असे दोन गट पडलेले असून गावातील मंडळी मुंबईकरांपासून दूर पळत असल्याने एकप्रकारे दुरावा दोघांमध्ये निर्माण होऊ लागला आहे.

First Published on: July 20, 2020 2:41 PM
Exit mobile version