दिल्‍ली दरबारासाठी कृपाशंकर दोन्‍ही मांडवाचे वर्‍हाडी

दिल्‍ली दरबारासाठी कृपाशंकर दोन्‍ही मांडवाचे वर्‍हाडी

कृपाशंकर सिंह

मांडव भाजपाचा असो की शरद पवारांचा, आपल्याला वर्‍हाडी होऊन राज्यसभेत जाता यायला हवं असा चंग काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी बांधला आहे. त्यासाठीच त्यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील घरी भेट घेतली आहे. दुसर्‍या बाजूला त्यांनी पुढच्या महिन्यात मुंबईत एका उत्तर भारतीयांच्या विशाल कार्यक्रमाचं आयोजन करुन भाजप अध्यक्ष अमित शहांसमोर आपले शक्तीप्रदर्शन करण्याचा चंग बांधला आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी आधी स्व.गुरुदास कामत, नंतर संजय निरुपम यांच्याबरोबरच्या तीव्र मतभेदांमुळे पक्षापासून दैनंदिन घडामोडींपासून स्वत:ला दूर ठेवले. त्यामुळे त्यांना आधी लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली.त्यानंतर काश्मिरमधील कलम ३७० आणि ३५ए रद्द करण्याच्या मोदी-शहांच्या मुद्याला बरोबर ठरवले. त्यामुळे दिल्लीत कृपाशंकर यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे काड्या करणार्‍यांना यश येऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी भाजपची साथ धरली पण प्रत्यक्षात पक्षप्रवेश न केल्याने ना त्यांना किंवा त्यांच्या मुलालाही उमेदवारी मिळाली नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार गेल्याने कुठल्याही पक्षाचे प्राथमिक सदस्य नसल्याने कृपाशंकर राजकीय विजनवासात कमालीचे अस्वस्थ आहेत.

या अस्वस्थेतून त्यांनी आपले व्याही झारखंडचे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आणि नि:स्सीम पवारनिष्ठ कमलेश सिंह यांच्या सोबत पुण्यात पवारांची त्यांच्या घरी भेट घेतली. या भेटीत पवारांनी त्यांना तुम्ही काय विचार केलाय, असे विचारले. त्यावर अजून आपण काहीच ठरवले नसल्याचे सांगून योग्य संधीच्या शोधात असल्याचे स्पष्ट केले.

राज्यसभेत लवकरच सात जागा रिकाम्या होणार आहेत. त्यापैकी विधानसभेतील आमदार संख्येनुसार भाजपच्या वाट्याला तीन तर सत्ताधार्‍यांच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. भाजपचे संजय काकडे, अमर साबळे हे निवृत होत आहेत. तर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची टर्मही संपत आहे. यापैकी आठवले यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल. तर काकडे, साबळे यांना वगळून त्यांच्या जागी कृपाशंकर सिंह यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. मात्र सिंह यांना याची खात्री नसल्याने आणि राष्ट्रवादीचे डी.पी.त्रिपाठी यांचे निधन झाल्यानेच पवारांचे बोट पकडून राज्यसभेत जाण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

पुढील महिन्यात बीकेसीमध्ये शहरातील उत्तर भारतीय समाजाला एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आणून शक्तीप्रदर्शन करण्याची योजनही त्यांनी आखली आहे. या कार्यक्रमासाठी भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रित करुन आपणच मुंबईत उत्तर भारतीय समाजाचे तारणहार आहोत हे दाखवून देण्यासाठी सिंह यांची धडपड सुरु आहे. याबाबत आपण कुणाकडून दिल्लीत जाणार, असे विचारल्यावर सिंह यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले; मात्र पवारांची भेट घेतल्याचे मान्य करुन आपल्याला राज्यातील राजकारणापेक्षा दिल्लीत रुची असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीकडे चार जागा येणार आहेत. मात्र चौथ्या जागेसाठी घोडा बाजार झाला तर सर्वपक्षीय मैत्रीमुळे कृपाशंकर सिंह बाजी मारु शकतात. तर महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्यास कृपाशंकर यांना अडचण आल्यास उत्तर प्रदेश मधूनही त्यांना संधी मिळू शकेल.

पवार- सिंह यांच्या भेटीबाबत भाजप नेत्यांना प्रतिक्रिया विचारली असता भाजपचा एक वजनदार नेता म्हणाला, कृपाशंकर भाजपमध्ये आहेत का? मात्र कुणीच स्पष्ट आश्वासन देत नसल्याने सिंह यांची घुसमट झाली आहे. तर सत्तेवर असलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्याची जी हुजुरी करण्याचे विलक्षण कसब अंगी असलेल्या सिंह यांना ’आपलं’ मानताना सत्ताधारी आणि विरोधकांनाही आस्तेकदम टाकावे लागत आहे.

First Published on: January 13, 2020 6:47 AM
Exit mobile version