लालबाग राजा फक्त मंडळ नाही तर सामाजिक बांधिलकीचा वसा – सुधीर साळवी

लालबाग राजा फक्त मंडळ नाही तर सामाजिक बांधिलकीचा वसा – सुधीर साळवी

लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी मायमहानगरच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान बोलताना (फोटो - संकेत शिंदे)

“लालबागचा राजा या मंडळाचे काम वर्षभर चालू असते. मंडळाचे काम करणे हा आमच्यासाठी आनंदाचा सोहळा असतो. लोकांचा मंडळावर विश्वास आहे. तो विश्वास वाढवण्याचे काम आम्ही करत आहोत. सामाजिक बांधिलकीचा हा वसा आम्ही पुढे नेत आहोत”, अशा शब्दात लालबाग राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी आपल्या भावना माय महानगरच्या फेसबुक लाईव्हमध्ये व्यक्त केल्या.

लालबागचा राजा या मंडळाची स्थापना १९३४ साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. वर्षागणिक लालबाग राजाच्या भक्तांमध्ये वाढ होत चालली याहे. मंडळाचा पसारा वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंडळाचे कार्य नेमके कसे चालते? करोडो भक्तांचा डोलारा सांभाळण्यासाठी मंडळ काय उपाययोजना करते? भक्तांनी राजाच्या चरणी वाहिलेल्या पैशाचे विनियोजन मंडळ कसे करते? आणि मंडळ यावर्षी काय करणार आहे? असे अनेक प्रश्न या फेसबुक लाईव्हमध्ये सुधीर साळवी यांना विचारले गेले. या सर्व प्रश्नांची दिलखुलास आणि मनमोकळी उत्तरे साळवींनी दिली.

मंडळाचे सामाजिक कार्य

मंडळाच्या सामाजिक कार्याची माहिती देताना साळवी म्हणाले की, लालबागचा राजा मंडळाने मागच्या ८४ वर्षांत सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. मंडळाच्या दानपेटीत किंवा देणगीच्या स्वरुपात जो निधी येतो तो सामाजिक कार्यावर खर्च केला जातो. डायलिसिस सेंटर सात वर्षापूर्वी सुरु केले. मुंबईतील डायलिसिस रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही प्रतिवर्षी ४० हजार रुग्णांचे डायलिसिस करतो. तेही अगदी १०० रुपये नाममात्र शुल्कात. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत आमच्याकडे मोठी वेटिंग लिस्ट आहे. वर्षाला तीन कोटी रुपये हे सेंटर चालवण्यासाठी लागतात.

तसेच संदर्भ पुस्तकपेढीतून महाराष्ट्रातील ११ हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी पुस्तके दिली जातात. स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय मागच्या दहा वर्षांपासून विनाशुल्क पद्धतीने चालू आहे. याचे ८८ हजार सभासद आहेत. विद्यार्थ्यांसाठी साने गुरुजी अभ्यासिका आहे. लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. आता लालबागचा राजा प्रबोधिनीच्या माध्यमातून युपीएससी परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन दिले जाणार आहे. तसेच मुंबईतील सरकारी रुग्णालयांतील गरीब रुग्णांना ऑपरेशनसाठी दहा टक्के निधी दिला जातो. अडीच ते तीन कोटी रुपये अशा शस्त्रक्रियेसाठी वर्षभरात दिले जातात. २००५ साली रायगडच्या महाड तालुक्यातील जुई गावात दरड कोसळली होती. ९४ कुटुंब त्यात गाडली गेली होती, त्या गावचे पुर्ण पुर्नवसन लालबागच्या राजाने केले आहे.

कसे चालते लालबाग राजाच्या मंडळाचे काम

मुंबईतील नामांकित मंडळापैकी लालबागचा राजा हे एक मंडळ आहे. कोट्यवधी भक्त गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात दर्शनासाठी येत असतात. मंडळाचे हे अवाढव्य काम कसे होते? याबद्दलही साळवी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, मंडळाचे ३५ कार्यकारिणी सदस्य असून ते फुलटाईम काम करतात. २८०० पुरूष सहकारी असून ७५० महिला सहकारी सभासद आहेत. त्याचबरोबर सल्लागार, ज्येष्ठ कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, स्थानिक व्यापारी देखील हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतात. मे महिन्यापासूनच मंडळ उत्सवाची तयारी सुरु करते. गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस सुट्टी घेऊन कार्यकर्ते काम करतात.
स्टेज कमिटी, सुरक्षा कमिटी, महिला कमिटी, पोलीस आणि महापालिका यांच्यासोबत समन्वय साधण्यासाठी एक कमिटी अशा विविध जबाबदारी घेऊन सांघिक पद्धतीने हे काम केले जाते. तसेही आमचे ३६५ दिवस काम चालूच असते. लालबाग मार्केटच्या माध्यमातूनही आम्ही अहोरात्र काम करत असतो.

सुरक्षेच्या बाबतीत कोणतीच तडजोड नाही

सुरक्षेचा प्रश्न आमच्यादृष्टीने सर्वात महत्त्वाचे असल्याचे साळवी यांनी सांगितले. भाविकांचे दर्शन व्यवस्थित होणे हाच आमचा महत्त्वाचा हेतू असतो. मुंबई पोलीसही यासाठी मेहनत घेतात. सीसीटीव्ही, लगेज स्कॅनर या यंत्रणा बसवलेल्या आहेतच. त्याशिवाय नवीन तंत्रज्ञानही वापरण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. यावर्षी दोन वेगळ्या रांगा लावणार आहोत. उजव्या पावलाच्या दर्शनासाठी वेगळी रांग लावली जाणार आहे.
सुरक्षेच्या अनुषंगाने आलेल्या प्रश्नांचीही साळवी यांनी उत्तरे दिली. २०१४ साली धक्काबुक्की करण्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर मंडळाने अनेक बदल केले असल्याचे साळवी यांनी सांगितले. धक्काबुक्की करण्याचा कोणत्याही कार्यकर्त्याचा हेतू नसतो. आम्ही सामाजिक भावनेतूनच हा उत्सव साजरा करत आहोत. महिलांना सुरक्षेच्या वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या महिला पदाधिकारी महिला सुरक्षेसाठी प्रयत्नशील असल्याचे साळवी यांनी सांगितले.

तासनतास रांगेचा प्रश्न आता संपलेला आहे.

२० ते २४ तास रांगेचा प्रश्न संपलेला असल्याचे साळवी म्हणाले. मागच्या चार ते पाच वर्षांपासून सात ते आठ तासातच भक्तांना राजाचे दर्शन मिळते आहे. व्हीव्हीआयपी दर्शनाबाबत बोलायचे झाल्यास हा शिष्टाचाराचा एक भाग आहे. मुख्यमंत्री जर दर्शनासाठी येत असतील तर त्यांना प्रोटोकॉलप्रमाणे दर्शनाची सोय करुन द्यावीच लागते. जगभरात हा राजकीय शिष्टाचार फॉलो केलाच जातो.

तर नवसाला पावण्याच्या मागची कथा अशी आहे…

१९३२ साली कोळी बांधवानी नवस करुन कायमस्वरुपी मार्केट मिळावं असा नवस केला होता. १९३४ साली त्यांना मार्केट मिळाले आणि तेव्हापासून लालबागच्या राजाची स्थापना झाली. तेव्हाच्या कोळी बांधवांची तशी श्रद्धा होती. तेव्हापासून आम्ही मंडळ म्हणून फक्त भाविकांची सेवा करत आहोत. बाकी नवस पुर्ण होणं किंवा न होणं ही भाविकांची श्रद्धा आहे. आम्हाला वाटतं ज्यांना आम्ही शस्त्रक्रियेसाठी मदत करत आहोत, त्यांच्यासाठी नक्कीच लालबागचा राजा पावत असेल.
यावर्षी नवीन काय पाहायला मिळणार…

यावर्षी नवीन काय?

ग्लोबल वॉर्मिंगच्या विषयाला लालबागच्या राजाने यावर्षी हात घातला आहे. Augmented Reality च्या माध्यमातून आम्ही पर्यावरणपूरक असा संदेश यावर्षी गणेशभक्तांना देणार असल्याचे साळवी यांनी सांगितले.

First Published on: September 4, 2018 5:46 PM
Exit mobile version