युनिफॉर्ममध्ये ड्युटीवर लवकरात लवकर रुजू व्हायचे आहे – ललित साळवे

युनिफॉर्ममध्ये ड्युटीवर लवकरात लवकर रुजू व्हायचे आहे  – ललित साळवे

भाग्यश्री भुवड । मुंबई

लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करुन नव्याने आयुष्याला सुरुवात करणाऱ्या ललित साळवेला अखेर सेंट जॉर्ज रुग्णालयातून मंगळवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. ललिता साळवे म्हणून रुग्णालयात दाखल झालेली आता ललित साळवे अशी नवी ओळख घेऊन रुग्णालयाच्या बाहेर पडला.आजपर्यंत मी ललिता म्हणून जगत होतो. पण आता मी ललित म्हणून रुग्णालयाबाहेर पडत आहे. त्याचा खूप आनंद होत आहे. शिवाय कधी एकदा पोलीसाची वर्दी घालून ड्युटीवर रुजू होतोय, असे झाले आहे, अशी प्रतिक्रिया ललितने ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली आहे.

युनिफॉर्म घालून पुन्हा कामावर रुजू होण्यास उत्सुक

या अगोदरच्या आयुष्यात ललिता म्हणून जगताना खूप कठीण आणि खडतर असा माझ्या जीवनाचा प्रवास होता. कधी यातून बाहेर पडतोय आणि कधी एकदाचा ललित होतो असे वाटत होते. आता फक्त डॉक्टर कधी एकदाचे सांगतात की तू फिट आहेस आणि मी माझ्या ड्युटीवर रुजू होतोय असे झाले आहे.

लिंग परिवर्तनसाठीचा लढा यशस्वी

२०१४ पासून माझी धडपड सुरू झाली. या लढ्यात मला खूप संघर्ष करावा लागला. अखेर मी ललित झालो. याविषयी बोलायला आता माझ्याकडे शब्द नाहीत. मी खूप आनंदी आहे. ६ महिन्यांनंतर माझ्या दुसèया शस्त्रक्रियेसाठी मी पुन्हा एकदा मुंबईत येणार आहे. तोपर्यंत माझे नेहमीचे आयुष्य सुरू होईल.

६ महिन्यांनंतर आणखी एक शस्त्रक्रिया

६ महिन्यांनंतर माझी आणखी शस्त्रक्रिया होईल. त्यावेळेस मी पूर्णपणे ललित असेन. त्यानंतर होणारे बदल खूप महत्त्वाचे असणार आहेत. जेव्हा मला कळले की मला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे तेव्हा त्या सर्व प्रसंगांना तोंड देताना मला खूप त्रास झाला होता. पण, आता त्या सर्वातून बाहेर पडताना फार बरे वाटत आहे.

प्रसारमाध्यमांचे सहकार्य मोलाचे

२०१४ पासून माझा ललित होण्याच्या दिशेने लढा सुरू झाला होता. आता या सहा महिन्यात माझे रोजचे आयुष्य सुरू होईल. प्रसारमाध्यमांनी मोठे सहकार्य केले. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत सपोर्ट केला, त्या सर्वांचा मी आभारी आहे. मला काही संस्थांनी १६ हजारांची मदत केली आहे. मी आतापर्यंत माझ्या पगारातून काही रक्कम जमा केली होती. जवळपास दीड लाख रुपये मी साठवले होते. त्याचा उपयोग मला माझ्या शस्त्रक्रियेसाठी झाला.

डॉक्टरांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा

सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांनी मला फार सपोर्ट केला. ललित नवा जन्म घेऊन या रुग्णालयातून बाहेर पडत आहे. माझ्या समुपदेशनापासून या प्रवासाची सुरुवात झाली. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे, याचा खूप आनंद झाला आहे

First Published on: June 13, 2018 3:15 AM
Exit mobile version