शहरातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी नाशिक पालिकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

शहरातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी नाशिक पालिकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

नाशिक शहरात करोनाची रुग्णसंख्या सुमारे एक हजार ८१७ झाली असून त्यातील ९२ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी आणि शहरातील करोनावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नवीन ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. महापालिका प्रशासन ‘झिरो किरोना’साठी प्रयत्नशिल असून त्याचाच एक भाग म्हणून या अ‍ॅक्शन प्लॅनकडे बघितले जात आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात फवारणी

प्रतिबंधित क्षेत्रात फवारणी केली जात आहे. आतल्या लोकांना बाहेर न जाऊ देणे, तसेच बाहेरच्या लोकांना आत येऊ दिले जात नाही. पुढील ८ ते १० दिवसांत प्रतिबंधित क्षेत्रातील पेशंट कमी होतील.

त्रिस्तरीय प्रणाली

महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे काम त्रिस्तरीय थ्री-टायर प्रणालीने चालते. सीसीसीमध्ये फक्त विलगीकरण केले जाते. डीसीएससीमध्ये रुग्णाच्या सौम्य लक्षणांवर उपचार करायचे असतात. अधिक त्रास असेल तर डीसीएच म्हणजे मविप्रच्या हॉस्पिटलमध्ये किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. डॉक्टरला या तीनमध्ये नेमके कुठे उपचार करायचे यासाठी त्याला वेळ दिला पाहिजे.

अत्याधुनिक पद्धतीने एक लाख लोकांची तपासणी

अत्याधुनिक पद्धतीने स्वॅब तपासणी करण्याची यंत्रणा महापालिकेला आता उपलब्ध होणार आहे. यात प्राधान्याने सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांची तपासणी केली जाईल. थोडक्यात जे या लढ्यात अग्रभागी आहेत त्यांची तपासणी केली जाणार आहे. अशा प्रकारे गरज पडल्यास एक लाख लोकांची तपासणी करण्याची आमची तयारी आहे.

सर्वेक्षण पथक

प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण पथक कार्यरत केले जाते. यात हायरिस्क असलेल्या रुग्णांना शोधले जाते. त्याचप्रमाणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते. स्वॅब घेण्यासाठी संबंधितांना हॉस्पिटलमध्ये नेले जाते.

होमिओपॅथिक औषधांची शौचालयांत फवारणी

या आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेने ठिकठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी केली आहे. याच धर्तीवर आता सार्वजनिक शौचालयांत होमिओपॅथिक औषधे फवारण्यात येतील. शौचालयांतून संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आल्यावर ही उपाययोजना करण्यात येणार आहे.

डेथ ऑडिट

मृतदेह

महापालिकेच्या वतीने मृत्यूचे ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. उपचाराची कोणतीही कमतरता राहू नये म्हणून हे ऑडिट असेल. मधुमेह, यकृत वा हृदयाचे विकार असलेल्या रुग्णांमध्येच दुर्देवाने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय कोणताही आजार नसलेल्या तरुणाचा करोनाने मृत्यू झाला तर ती अधिक चिंतेची बाब ठरते. त्यामुळे या काळात होणार्‍या मृत्यूंची नेमकी कारणे कोणती ही शोधण्यासाठी डेथ ऑडिट केले जाणार आहे.

विलगीकरणात जीवनसत्वयुक्त आहा

विलगीकरण कक्षात असलेल्या रुग्णांना वेळेत आणि पुरेसा आहार दिला जातो. त्यात जीवनसत्व आणि प्रथिनांचाही शास्त्रीय पद्धतीने विचार होतो. बॅलन्स डायट देण्याचा विचार केला जातो.

विलगीकरण केंद्र

ज्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये करोनाचे लक्षणे नाहीत, परंतु त्यांच्याघरी काळजी घेण्यासाठी पुरेशा सोयी सुविधा नाही, स्वतंत्र बाथरुम आणि शौचालयांची व्यवस्था नाही अशा रुग्णांना विलगीकरण केंद्रात दाखल केले जात आहे.

बाहेरुन येणार्‍यांसाठी मुबलक हॉटेल्स

कोणत्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावे याविषयी महापालिकेची कोणतीही सक्ती नाही. ५०० रुपये भाडे असलेल्या हॉटेलपासून ताज हॉटेलपर्यंत सर्वांशीच आम्ही चर्चा केलेली आहे. संबंधित व्यक्ती विमानतळावर उतरल्यावर त्यांची यादी केली जाते. संबंधित समन्वयक अधिकारी त्यांची विचारपूस करुन हॉटेलची यादी महापालिकेला पाठवतो. त्यानुसार संबंधितांना हॉटेल्स उपलब्ध होतात.

४ हजार बेड्सची व्यवस्था तयार

महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये बेडची संख्या पुरेशी आहे. मात्र एक सेंटर भरल्याशिवाय दुसरे चालू करता येत नाही. कर्मचार्‍यांची संख्या मर्यादित असल्याने एकावेळी सर्वच सेंटर्स सुरू करता येत नाहीत. सध्या समाजकल्याणमध्ये ५०० बेड्स, मेरीत २००, धात्रक फाटा परिसर, नवीन बिटकोत ३००, ठक्कर डोममध्ये ३५० बेडची क्षमता आहे. एकाच वेळी चार हजार रुग्ण जरी आल्यास महापालिकेला बेड्सची कमतरता भासणार नाही अशी व्यवस्था करुन ठेवण्यात आली आहे.

खासगी हॉस्पिटल्सवर निगराणी

हॉस्पिटल्स आकारत असलेल्या वाढीव बिलांच्या पार्श्वभूमीवर सहा पथके तयार करण्यात आली आहेत. ज्यांनी जास्त दर आकारणी केली हे तपासणीअंती आढळून आल्यास संबंधित हॉस्पिटलला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जादा दर आकारणीबाबत आयकर विभागाच्या निवृत्त अधिकार्‍यांची मदत घेतली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ही प्रणाली विकसित केली जाणार आहे. मात्र हे खासगी हॉस्पिटलही इमर्जन्सी सेवा देत आहेत, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. या हॉस्पिटलवर एकतर्फी कारवाई करणे उचित होणार नाही.

हेल्पलाईन, एसएमएस, व्हिडिओ

कोणत्याही रुग्णांची परवड होऊ नये म्हणून महापालिकेने हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केले आहेत. तसेच, चार लाख लोकांना एसएमएस पाठवण्यात आले आहेत. याशिवाय, ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात मेसेज देण्यात आले आहेत.

२५ हजार लोकांना होमिओपॅथी औषधांचे वाटप

प्रतिबंधित क्षेत्रातील सुमारे २५ हजार लोकांना होमिओपॅथीच्या औषधांचे वाटप करण्याचे नियोजन आहे. त्यात पहिल्या टप्प्यात फुलेनगर आणि राम नगरमध्ये १० हजार लोकांना औषधांचे वाटप होईल.

उपलब्ध बेड्सच्या माहितीसाठी डॅशबोर्ड

खासगी रुग्णालयातील उपलब्ध बेड किती, नजीकच्या रुग्णालयात बेड मिळेल की नाही याची माहिती एका क्लिकसरशी सोमवारपासून  डॅशबोर्डवर मिळणार आहे. रुग्णांना खासगी रुग्णालयात जायचे असेल तर, आपल्या घरालगत परवडेल असे खासगी रुग्णालय कोणते, त्यातील ऑक्सिजन वा व्हेंटिलेटरचे बेड किती, शिल्लक बेड कधी, वेटिंग लिस्ट काय याची एका डॅश बोर्डद्वारे माहिती मिळू शकेल. पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने असा डॅशबोर्ड विकसित केला आहे.

रस्त्यावरील मास्कचीही होणार तपासणी

रस्त्यावरील मास्क विक्रीची तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत केली जाणार आहे.  त्यात आरोग्याला धोका निर्माण होईल असे मास्क आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

 

First Published on: June 27, 2020 10:30 PM
Exit mobile version