Lata Mangeshkar: भाजपनंतर कॉंग्रेसचीही शिवाजी पार्कात लता दीदींचे स्मारक बनवण्याची मागणी

Lata Mangeshkar: भाजपनंतर कॉंग्रेसचीही शिवाजी पार्कात लता दीदींचे स्मारक बनवण्याची मागणी

स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्क येथेच व्हावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  सोमवारी येथे केली. स्मारक चांगल्या दर्जाचे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नाना पटोले यांनी आज प्रभुकुंज येथे जाऊन मंगेशकर कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे, अशी मागणी केली आहे. मंगेशकर कुटुंबाची भेट घेतल्यानंतर  पटोले यांनी वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना  स्मारकाची मागणी उचलून धरली.

देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क मध्ये व्हावे हे काँग्रेसची भूमिका आहे, असे पटोले म्हणाले.

पेडर रोडच्या उड्डाणपुलाचा जेव्हा विषय आला होता तेव्हा लतादीदींनी मला डिस्टर्ब  होईल म्हणून सांगितले होते. त्यावेळी आघाडीचे सरकार होतो आणि तेव्हा आम्ही निर्णय घेतला. परिणामी पेडर रोडला उड्डाणपूल झाला नाही, असेही पटोले यांनी सांगितले.

काल, शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना मुंबई अध्यक्ष भाई जगताप वगळता काँग्रेसचा कुणीही मोठा नेता उपस्थित नव्हता. याकडे पटोले यांचे लक्ष वेधले असता, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत.  त्यामुळे ते काल लतादिदींच्या अंत्यदर्शनाला येऊ शकले नाहीत. माझ्या बहिणीची सासु वारल्यामुळे मी तिकडे होतो. मात्र,  राज्यभरत  प्रत्येक तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी  लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे, असे पटोले म्हणाले.

शिवाजी पार्कवरील स्मारकाच्या मागणीला आंबेडकर यांचा विरोध

शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका असे स्पष्ट करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी स्वस्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे करण्याच्या मागणीला विरोध केला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे, अशी मागणी केली आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही वृत्त लता मंगेशकर यांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकाची मागणी उचलून धरली.

या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी लतादीदींच्या शिवाजी पार्कवरील स्मारकाच्या मागणीला विरोध केला. शिवाजी पार्क हे एकमेव खेळाचे मैदान आहे. येथे विद्यार्थ्यांचे सामने होतात. त्यामुळे शिवाजी पार्कवर सामने खेळले जावेत. स्मारक करायचे असेल तर त्यासाठी वेगळ्या जागा आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

First Published on: February 7, 2022 6:29 PM
Exit mobile version