पहिल्या स्मृती दिनानिमित्त “लतांजली”; राखी, हेमा मालिनीसह अनेकजण राहणार उपस्थित

पहिल्या स्मृती दिनानिमित्त “लतांजली”; राखी, हेमा मालिनीसह अनेकजण राहणार उपस्थित

मुंबई – प्रत्येक भारतीय मनामनात अढळ स्थान असलेल्या आणि आपल्या आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृती दिनी मुंबईत एक भव्य “लतांजली” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या आवाजाने अजरामर असणाऱ्या लता दिदींचा 6 फेब्रुवारी प्रथम स्मृती दिन असून भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी एक संगीतप्रेमी या नात्याने मेराक इव्हेंट यांच्या सहयोगाने “लतांजली” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

6 फेब्रुवारी रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी 6.30 हा कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध गायिका साधना सरगम, बेला शेंडे, शरयू दाते, संपदा गोस्वामी, निरुपमा डे आदी गायिका तर निवेदक म्हणून संदिप पंचवटकर, आर.जे.गौरव यांच्या सह नामवंत वादक असे एकूण 50 कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत.

विशेष बाब म्हणजे लता दिदींनी ज्या अभिनेत्रींना आवाज दिला त्यातील तब्बल 12 सुपरस्टार अभिनेत्रींची उपस्थिती हे सुध्दा या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे. यामध्ये सिनेस्टार अभिनेत्री राखी, हेमा मालिनी, आशा पारेख, मौसमी चटर्जी, पद्ममीनी कोल्हापूरे, नितू सिंग, बिंदू, रिना राँय, पुनम ढिल्लो, रविना टंडन, राणी मुखर्जी आणि काजोल यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.

या कार्यक्रमाला संगीतकार आनंदजी, प्यारेलाल आदी ही उपस्थिती राहणार आहे. रसिकांना हा कार्यक्रम विनामूल्य असून जाहीर होताच हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाल्याची माहिती संयोजक मंजिरी हेटे आणि प्रसाद महाडकर यांनी दिली.

मुंबई पोलीस बँडतर्फे लतांजली

“लतांजली” कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी षण्मुखानंद सभागृहाच्या चौकात मुंबई पोलीस बँड तर्फे दिदींची काही निवडक गाणी वाजवून श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे.

First Published on: February 4, 2023 8:04 AM
Exit mobile version