कन्नड पोलिसांची पुन्हा दादागिरी, मराठी तरुणांवर लाठीचार्ज

कन्नड पोलिसांची पुन्हा दादागिरी, मराठी तरुणांवर लाठीचार्ज

बेळगावमध्ये मराठी तरुणांवर लाठीचार्ज

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगावमध्ये गुरुवारी काळा दिवस पाळण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली. मात्र या रॅलीनंतर बेळगाव पोलिसांनी या रॅलीवर जोरदार लाठीहल्ला केला. सकाळी सीमाभागातील बेळगावमध्ये मराठी तरुणांनी सायकल रॅली आयोजित केली होती. मात्र, या सायकल रॅलीवर बेळगाव पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यानंतर बेळगावमधील वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे.

शांततामय रॅलीवर लाठीमार करण्याचं काहीही कारण नाही. मात्र, कर्नाटकचे पोलिस द्वेषभावनेने वागत आहेत. हा गेल्या ६० ते ७० वर्षांचा लढा आहे. हा सगळा प्रकार पूर्णपणे लोकशाही विरोधी असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं पाहिजे.

छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

नक्की काय झाला गोंधळ?

दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये मराठी भाषिकांकडून काळा दिवस पाळला जातो. यासाठी मूक मोर्चा आणि शांततामय मार्गाने सायकल रॅली देखील काढली जाते. कर्नाटक राज्य दिनाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये काळा दिवस पाळला जातो. मात्र, गुरुवारी काढण्यात आलेल्या या शांततामय मूक सायकल मार्चवर कर्नाटक पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. गोवा वेस सर्कल परिसरात काही कन्नड कार्यकर्ते या मोर्चामध्ये झेंडे घेऊन सामील झाले. त्यानंतर रॅलीमध्येच फटाके वाजवण्यात आले. त्यामुळे रॅलीमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांना केलेल्या या अमानुष मारहाणीमध्ये २० ते २५ मराठी कार्यकर्ते जखमी झाले असून त्यातले दोघे गंभीर असल्याचं वृत्त काही स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलं आहे.

First Published on: November 1, 2018 1:17 PM
Exit mobile version