म्हाडा पेपरफुटीप्रकरणी वकिलाला अटक

म्हाडा पेपरफुटीप्रकरणी वकिलाला अटक

राज्यात सर्वत्र खळबळ माजविणार्‍या म्हाडा पेपरफुटीचे धागेदोरे जळगावमध्ये मिळाले आहेत. जळगावमधील अ‍ॅड. विजय दर्जी यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच ही कारवाई केली आहे.

जळगाव शहरामधील बालाजी प्लेसमेंटचे संचालक विजय दर्जी यांना म्हाडाच्या पेपरफुटीप्रकरणी जळगावातून अटक करण्यात आली. जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये विजय दर्जी यांची बालाजी प्लेसमेंट नावाने शाखा आहे. याद्वारे सुशिक्षित तरुणांना नोकरी देण्याचे काम ते करतात. राज्यात शिक्षकांच्या टीईटी घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. यात म्हाडा पेपरफुटीचे प्रकरणही समोर आले आहे. या प्रकरणात दर्जींच्या कार्यालयातील एका कर्मचार्‍याची चौकशी काही महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानंतर बुधवारी पुणे पोलीस जळगावात धडकले.

अ‍ॅड. विजय दर्जींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात इतर परीक्षांमध्येही घोटाळे झाले असल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचाही तपास करण्यास सुरुवात केली. त्यात अनेक धागेदोरे सापडले असून पोलिसांनी काही आरोपींना याआधीच अटक केली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात म्हाडामध्ये भरती परीक्षा होणार होती, मात्र त्याचा पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. जीए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती, पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले होते.

First Published on: May 27, 2022 3:00 AM
Exit mobile version