कुठल्याही रामभक्ताला अडवणे चुकीचे

कुठल्याही रामभक्ताला अडवणे चुकीचे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला होत असलेल्या विरोधामुळेच त्यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यावर नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता, अयोध्येला जाणार्‍या प्रत्येक रामभक्ताचे स्वागतच झाले पाहिजे त्याला अडवणे चुकीचे आहे, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची शाल खांद्यावर घेतल्यापासून त्यांच्या प्रत्येक भूमिकेला भाजपकडून जोरदार समर्थन मिळत आहे. परंतु राज ठाकरे यांनी अयोध्येच्या दौर्‍याची घोषणा करताच उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याकडून या दौर्‍याला कडाडून विरोध होऊ लागला. राज ठाकरे यांनी आधी उत्तर प्रदेशातील श्रमिकांना केलेल्या मारहाणीबद्दल आधी माफी मागावी, तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिल्यामुळे वातावरण तापले. त्यावर आतापर्यंत भाजपकडून चुप्पी साधण्यात येत आहे.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, मला असे वाटते की राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केलेला नसून केवळ पुढे ढकलला आहे. जो रामभक्त अयोध्येला जाईल, त्याचे स्वागतच झाले पाहिजे. त्याला अडवणे चुकीचेच आहे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे ते जेव्हा केव्हा अयोध्येत जातील त्यावेळी त्यांचे स्वागतच होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संजय राऊत यांच्यासंदर्भात भाष्य करताना ते काही महत्त्वाची व्यक्ती नाही. राऊत सकाळी वेगळे बोलतात, संध्याकाळी वेगळे बोलतात. गेले तर कशासाठी गेले, नाही केले तर का नाही गेले? असे विचारतात. त्यामुळे अशा व्यक्तीला मी उत्तरे देत नसतो, अशा शब्दांत फडणवीसांनी संजय राऊतांना टोला लगावला.

First Published on: May 21, 2022 5:00 AM
Exit mobile version