अज्ञात वाहनाच्या धडकेत ३ महिन्याच्या बछड्याचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत ३ महिन्याच्या बछड्याचा मृत्यू

प्रातिनिधीक फोटो

शिरूर- भिमाशंकर या महामार्गावर बुरसे वाडीलगत तनपुरे वस्ती येथे अज्ञात वाहनाने ३ महिन्याच्या बछड्याला धडक दिल्याने डोक्याला जबर मार बसल्याने बिबट्याचा बछडा जागीच ठार झाल्याची माहिती मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील पश्चिम भागातील तनपुरे वस्ती येथे हा ३ महिन्याचा मादी जातीचा बछडा अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला आहे. ही घटना गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या बछड्याची तपासणी केली. यावेळी वन विगागाकडून असे सांगण्यात आले की, हा बिबट्याचा बछडा असून त्याचे वय ३ महिने तर ६ किलो वजन आहे. अज्ञात वाहन बछड्याला धडकल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला आणि बिबट्याचा बछडा जागीच मृत पावला.

खेड तालुक्यातील खरपुडी येथील रोप वाटिकेमध्ये मृत बछड्याचे अंत्यसंस्कार करून त्याला अग्नी देण्यात आला असल्याचीही माहिती मिळतेय. या चिमुकल्या बछड्याचा मृत्यू कसा झाला याचा तपास करत असताना असा संशय व्यक्त केला जात आहे की, पाणी पिण्यासाठी हा बछडा चासकमान धरण या परिक्षेत्रात येत असावा. यावेळी तो रस्ता ओलांडतांना अपघात झाला असावा.

First Published on: January 28, 2021 3:52 PM
Exit mobile version