चांदगिरीत बिबट्या जेरबंद 

चांदगिरीत बिबट्या जेरबंद 

नाशिकरोड । दारणा काठच्या गावांमध्ये बिबट्यांचे दर्शन रोजच होत असतांना वनविभागाच्या पिंज-यातही ते जेरबंद होत आहेत, गुरुवारी(दि.३०) पहाटे चांदगिरी गावाच्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला आहे. हा सातवा बिबट्या असून वनविभागाने पिंजरा ताब्यात घेतला आहे.

चांदगिरी गावाला लागून असलेल्या सामाजिक वनीकरण क्षेत्राला लागून असलेल्या काबरा फार्म हाऊस या शेतात पिंजरा लावला होता. गुरुवारी पहाटे बिबट्या पिंज-यात अडकल्याचे येथील व्यवस्थापक नितीन सुर्यवंशी यांनी पाहिल्यावर पोलीस पाटील लखन कटाळे यांना फोन करुन माहिती दिली. पोलीस पाटील लखन कटाळे यांनी वन विभागाच्या अधिका-यांना माहिती दिली, त्यानंतर वन परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी व त्यांच्या पथकाने पिंजरा ताब्यात घेतला आहे.

दारणा काठच्या गावांत गेल्या दोन महिन्यात झालेल्या हल्ल्यात चार बळी गेले होते, त्यानंतरही हल्ले सुरुच होते, यात शेवगे दारणा, सामनगाव व चेहेडी या तीन ठिकाणी आजी-आजोबांच्या प्रसंगावधनाने बालके बिबट्याच्या हल्ल्यातून वाचली होती. पळसे, जाखोरी, सामनगाव, चिंचोली, चाडेगाव, देवळाली कॅम्प, आणि चांदगिरी असे सात बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहेत, दरम्यान चेहेडी येथील पंपींग परिसरात भगवान बोराडे यांच्या मळ्यातील वासरावर दोन दिवसांपुर्वी बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

First Published on: July 30, 2020 8:49 AM
Exit mobile version