स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवून स्वतःचे अस्तित्व दाखवून देऊ 

स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवून स्वतःचे अस्तित्व दाखवून देऊ 

ठाणे :  आतापर्यंत काँगेस,राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या राजकीय पक्षांनी कुणबी समाजाचा फक्त राजकारणासाठी वापर केला आहे. या पुढे सरकारने कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत व समाजाला न्याय मिळाला नाही तर स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवून स्वतःचे अस्तित्व दाखवून देऊ, असा इशारा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सोमवार पार पडलेल्या राज्यव्यापी निर्धार परिषदेत कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी बोलताना दिला. यावेळी विदर्भ, मराठवाडा, कोकण परिसरातील कुणबी बांधव व राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

या निर्धार परिषदेत ठाण्यातील साकेत मैदानाजवळून जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.व त्यानंतर गडकरी रंगायतन येथे कुणबी राज्यव्यापी निर्धार परिषद पार पडली. त्यावेळी कुणबी सेनाप्रमुखांनी वरील इशारा दिला. कुणबी सेनेने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, समृध्दी महामार्गाला जमीन देणारे शेतकरी, तानसा वैतरणा धरण प्रकल्पग्रस्तासाठी अनेकवेळा रेल्वे व महामार्ग अडवून आंदोलने केली आहेत.

सध्या शेती व्यवसाय समपूष्टात आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, परंतु कुणबी समाजाचे व शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न अजून सुटलेले नाहीत प्रत्येकवेळी सर्व पक्षांनी कुणबी समाजाला मतांसाठी गृहीत धरले आहे. ओबीसी प्रवर्गात कुणबी संख्या जास्त असतानाही ओबीसी आरक्षण मिळत नाही.आता शेतकऱ्यांचा बुलंद आवाज संसदेत पोहचला पाहिजे.यासाठी सर्व समाजाने एकत्र येण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. तसेच राज्यात विदर्भ, मराठवाडा व कोकण या भागात पाच ठिकाणी निर्धार परिषदा होणार असल्याचे सांगितले.यावेळी राज्यातून कुणबी सेनेचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

First Published on: November 28, 2022 9:31 PM
Exit mobile version