पत्नीस जाळणार्‍या पतीस जन्मठेप

पत्नीस जाळणार्‍या पतीस जन्मठेप

मुलाच्या घरी गेल्याचा राग येऊन पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जीवे मारणार्‍या पतीस अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जयराम किसन भोये (रा. म्हसोबा नगर, पेठरोड) असे आरोपीचे नाव आहे.

जयराम भोये याचा कांताबाई जयराम भोये यांच्यासोबत दुसरा विवाह झाला होता. २४ जानेवारी २०१६ रोजी कांताबाई या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला मुलगी झाल्याने तिला पहावयास गंजमाळ येथे गेल्या होत्या. तेथून परतल्यावर जयराम याने कांताबाई यांच्याशी वाद घातला. तुझ्या मुलांचे लग्न झाले असून तु त्यांच्याकडे जायचे नाही असे सांगत आरडाओरड करीत कांताबाईला बळजबरीने घरी आणले. तु मला न विचारता का गेलीस अशी विचारणा करत मारहाण केली. त्यानंतर कांताबाईच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. जखमी अवस्थेत कांताबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात कांताबाई यांच्या फिर्यादीनुसार जयराम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक बी. एम. देशमुख यांच्याकडे कांताबाई यांनी जबाब दिला तसेच कार्यकारी न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे जबाब देत जयराम विरोधात तक्रार दिली. त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांच्या पथकाने तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. डॉ. सुधीर एस. कोतवाल यांनी युक्तीवाद केला. त्यात १२ साक्षीदार तपासण्यात आले. कांताबाई यांनी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबास न्यायालयाने ग्राह्य धरत जयरामला कांताबाईचा खुन केल्याप्रकरणी जन्मठेप व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

First Published on: March 6, 2021 6:09 PM
Exit mobile version