तुमचं रेशनकार्ड ‘आधार’ला लिंक आहे का! अन्यथा मोफत रेशन बंद

तुमचं रेशनकार्ड ‘आधार’ला लिंक आहे का! अन्यथा मोफत रेशन बंद

रेशन कार्ड

कोरोनाच्य़ा प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने प्रवासी मजुरांसह कित्येकजणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. त्यामुळे त्यांना रोजच्या रोजीरोटीची समस्या निर्माण झाल्याचे समोर आले होते. अशा लोकांना सहाय्य म्हणून सरकारचे वन नेशन, वन रेशन कार्ड अंतर्गत मोफत रेशन जाहीर करण्यात आले होते. या योजनेंतर्गत कोणत्याही राज्यात राहणाऱ्या नागरिकांना लाभ होऊ शकतो. केंद्रीय अन्न मंत्रालयाने रेशनकार्डला आधार लिंक करण्यासाठी बंधनकारक केले होते.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटूंब लाभार्थी व अन्न योजनेतील लाभार्थ्यांना आधार लिंक करून कुटूंबातील किमान एका व्यक्तीचा मोबाईल नंबर नोंदणी करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. यासाठी शासनाकडून जानेवारी २०२१ ची मुदत देखील दिली आहे. जर ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन रेशनकार्डवर आधार लिंक केले नसेल तर १ फेब्रुवारीपासून रेशन कार्डवर मिळणारे मोफत रेशन अर्थात धान्य बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, हे रेशनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी तुमचे रेशनकार्ड रास्त भाव दुकानदाराकडील पॉज मशीनवर करता येणार आहे. यासाठी लाभार्थींना आपले आधारकार्ड रास्तभाव दुकानदाराकडे घेऊन जावे लागणार आहे. जे लाभार्थी आधार क्रमांक संबंधित रास्तभाव दुकानदारांकडे जमा करणार नाही, त्यांना रेशन मोफत धान्य मिळणार नाही, असे सांगितले जात आहे.

First Published on: January 27, 2021 6:52 PM
Exit mobile version