पवारांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

पवारांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची पहिला यादी तयार झाली आहे. येत्या एक-दोन दिवसांत ती जाहीर होण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाहीत. असे असले तरी पवार यांच्या कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केल्यानंतर सर्व पक्षांप्रमाणेच राष्ट्रवादीचीही उमेदवार यादी तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक ७ टप्प्यांत होणार असून पहिल्या चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात ११ एप्रिलला ७ मतदारसंघात, १८ एप्रिलला १० मतदारसंघात, २३ एप्रिलला १४ मतदारसंघात आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान होणार आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

पवार घराण्याला यावेळी प्रथमच राजकीय महत्त्वाकांक्षेच्या वादळाने चांगलेलच हादरवून टाकले आहे. शरद पवारांच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबातील मतभेद जाहीरपणे समोर आले आहेत. नातू पार्थ पवार यांच्यासाठी शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, असे वर वर पाहता दिसून येत असले तरी त्यांना माघार घ्यावी लागण्यामागे कौटुंबिक वादाच कारणीभूत आहे, असे मानले जाते.

पवारांचे थोरले बंधू आप्पासाहेब पवार यांचा नातू रोहित पवार यांनी मात्र शरद पवारांची बाजू घेतली आहे. ‘कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा विचार करून निर्णय बदलावा’ असं कळकळीचे आवाहन त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या आजोबांना केले आहे. पराभवाच्या भीतीमुळे नाही, तर पवार कुटुंबातील तीन व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात नकोत, म्हणून माघार घेत आहे, असे शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले असले तरी पवारांनी माघार घेण्यामागचे कारण अन्य कुठे दूर नसून ते त्यांच्या घरातच आहे, अशी चर्चा आहे.

राष्ट्रवादीची संभाव्य उमेदवार यादी

ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील

बारामती – सुप्रिया सुळे

नाशिक – समीर भुजबळ

बुलढाणा – राजेंद्र शिंगणे

सातारा – छत्रपती उदयनराजे भोसले

मावळ – पार्थ पवार

कोल्हापूर – धनंजय महाडिक

भंडारा – गोंदिया – वर्षा पटेल

जळगाव – गुलाबराव देवकर

रायगड – सुनील तटकरे

शिरूर – अमोल कोल्हे

ठाणे – आनंद परांजपे

First Published on: March 13, 2019 4:13 AM
Exit mobile version