चिमुकले पाहताहेत आई,वडिलांची वाट

चिमुकले पाहताहेत आई,वडिलांची वाट

बाल कल्याण समिती नाशिकमार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया अंतर्गत बालगृहामध्ये काळ जी व संरक्षणाची गरज असलेली मुलेमुली दाखल केली जातात. या बालकांचा पालकांचा शोध घेतला जात आहे. महिला, गजानन, मंगल, पवन, रक्षा लक्ष्मण कांबळे, मान्यता भारत पवार, सुधान कादरभाई मेमन ही बालके आधाराश्रम, घारपुरे घाट, नाशिक येथे आणि अनमोल मुलांचे निरीक्षणगृह, उंटवाडी रोड येथे दाखल असून, मुलेमुली आई-वडिलांची आतुरतेने वाटत पाहत आहेत.

पालकांनी आधाराश्रम संस्था, घारपुरे घाट, नाशिक ०२५३-२५८०३०९, २९५०३०९ या ठिकाणी किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नाशिक समाज कल्याण आवार, नाशिक-पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक ०२५३-२२३६३६८, २९९१२९४ या ठिकाणी संपर्क साधावा. ३० दिवसांच्या आत मुलामुलींचा दावा करण्यास कोणीही आले नाही तर मुलामुलींना पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसानाचा विचार करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी दिली.

मद्यपी आई, वडिलांनी भरस्त्यात सोडून दिले रक्षाला

रक्षा लक्ष्मण कांबळे (वय ३ वर्षे ८ महिने) हिला १७ नोव्हेंबर २०१९ रोजी  वडील लक्ष्मण गंगाराम कांबळे व आई हे दोघे मद्यधुंद अवस्थेत  कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड, नाशिक येथे रस्त्याच्या कडेल उन्हात सोडून दिले होते. तिला चाईल्ड हेल्पलाईन व पोलिसांनी आधाराश्रमात दाखल केले. आजपर्यंत तिचे वडील भेटण्यासाठी आले नाहीत.

 

भाजीमार्केटमध्ये आढळली महिमा

महिमा (वय ६) ही २१ जुलै २०२३ रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान गांधीनगर, भाजीमार्केट, उपनगर येथे विनापालक आढळून आली. तिला पोलिसांनी बालकल्याण समितीच्या आदेशान आधाराश्रम संस्थेत दाखल करण्यात आले आहे. तिच्या पालकांचा शोध घेतला जात आहे. तिचे पालक आधाराश्रमात आलेले नाहीत.

रेल्वे पोलिसांना सापडला पवन

 पवन (वय ७ वर्षे ३ महिने) २ डिसेंबर २०२२ रोजी मनमाड पोलीस रेल्वे पोलीस ठाणे (ता. नांदगाव, जि. नाशिक) विनापालक आढळून आला. पोलिसांनी त्यास बालकल्याण समितीच्या आदेशाने आधाराश्रमात दाखल केले आहे. त्याच्या पालकांचा शोध घेतला जात असून, आत्तापर्यंत त्याचे पालक भेटण्यासाठी आलेले नाहीत.

 

नाशिकरोड बसस्थानकात होता गजानन

गजानन (वय ४) १ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १.३० वाजेदरम्यान नाशिकरोड बसस्टॅण्ड परिसरात विनापालक आढळून आला. पोलिसांनी त्यास बालकल्याण समिती नाशिकच्या आदेशाने आधाराश्रम, नाशिक येथे दाखल केला आहे. त्याच्या पालकांचा शोध घेतला जात असून, आत्तापर्यंत त्याचे पालक भेटण्यासाठी आलेले नाहीत.

 

पंचवटीत विनापालक मंगल

मंगल (वय २) ९ मे २०२३ रोजी दत्तू रामदास कडलग यांच्यामार्फत पंचवटी पोलिसांनी बालकल्याण समितीच्या आदेशाने आधाराश्रमात दाखल केले आहे. तिच्या पालकांचा शोध घेतला जात आहे.

वणीत आढळली बेवारस मान्यता

मान्यता भारत पवार (वय १) ही १६ मे २०२२ रोजी वणी पोलिसांना अहिवंतवाडी शिवारात वणी ते नांदुरी रोडलगत अहिवंतवाडी एसटी स्टॅण्डसमोर बेवारस आढळून आली. पोलिसांनी तिला आधाराश्रमात दाखल केले आहे.

 

मालेगावात पोलिसांना बेवारस मिळाला सुधान

सुधान कादरभाई मेमन (वय ५ वर्षे ५ महिने) हा १५ सप्टेंबर २०१९ रोजी छावणी मालेगाव पोलिसांना विनापालक आढळून आला. पोलिसांनी त्याला आधाराश्रमात दाखल केले आहे.

 

बिटको चौकात विनापालक आढळला अनमोल

अनमोल (वय १०) १८ जुलै २०२३ रोजी बिटको चौक, नाशिकरोड येथे पोलिसांना विनापालक आढळून आला. त्याला ऐकू व बोलता येत नाही. त्याला बालगृह, नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.

 

First Published on: November 29, 2023 2:48 PM
Exit mobile version