एलएलबी 3 वर्षांचा निकाल जाहीर

एलएलबी 3 वर्षांचा निकाल जाहीर

प्रातिनिधीक फोटो

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) तीन वर्षे विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 150 पैकी तीन जणांनी सर्वाधिक 133 गुण मिळवले तर 15 विद्यार्थ्यांना भोपळाही फोडता आला नाही.

एलएलबीच्या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी 1 जून रोजी सीईटी सेलकडून परीक्षा घेण्यात आली होती. 150 मार्कांची असलेल्या या परीक्षेत तब्बल तीन विद्यार्थ्यांनी सर्वाधिक 133 गुण मिळवले. एकीकडे सर्वाधिक गुण मिळवणार्‍यांची संख्या कमी असताना सर्वाधिक 1 हजार 140 विद्यार्थ्यांना 54 गुण मिळाले. तर 11 विद्यार्थ्यांना फक्त एकच गुण मिळवता आला. मात्र तब्बल 15 विद्यार्थ्यांना भोपळाही फोडता आला नाही.

विशेष म्हणजे 102 विद्यार्थ्यांना 102 गुर मिळाले तर 100 विद्यार्थ्यांना 100 गुण मिळाले. एलएलबी तीन वर्षाच्या प्रवेश परीक्षेसाठी ४४ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ८० टक्के विद्यार्थ्यांनी म्हणजे ३६ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती लवकरच सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी संख्या क्षमतेपेक्षा अधिक असल्याने उमेदवारांना त्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रांच्या पर्यायाऐवजी जवळचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. अनेक विद्यार्थी सूचना देऊनही वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागले होते. त्याच्याही काही तक्रारी कक्षाकडे आल्याची माहिती कक्षाकडून देण्यात आली.

राज्यात 14 हजार जागा
राज्यभरात तब्बल १४ हजार ३२० जागा आहेत. यंदा नव्याने १० महाविद्यालय वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी ५०० जागा वाढतील अशी अपेक्षा आहे. राज्याबाहेरील ३ हजार ६२६ विद्यार्थ्यांनीही अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्यामध्ये २६ हजार ६९ विद्यार्थी आहेत. तर १४ हजार ४२० विद्यार्थीनी आहेत. खुल्या वर्गातून २२ हजार ६९० अर्ज आले आहेत.एसईबीसी मधून २०३३, ओबीसी मधून ७०८१,एसबीसी मधून ५५०, एसएसी मधून ७७१० इाणि इतर प्रवर्गातूनही ५०० ते १ हजारच्या दरम्यान अर्ज आले आहेत.

First Published on: June 19, 2019 4:32 AM
Exit mobile version