विधान परिषदेसाठी लॉबिंग सुरु; कुणी मातोश्रीवर तर कुणी सिल्वर ओकवर

विधान परिषदेसाठी लॉबिंग सुरु; कुणी मातोश्रीवर तर कुणी सिल्वर ओकवर

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे स्थापन झाल्यानंतर आता अनेकांच्या नजरा या विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागते याकडे लागल्या आहेत. आगामी पाच महिन्याच्या काळात विधान परिषदेच्या एकूण २४ जागा रिक्त होणार असून या रिक्त जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी आतापासूनच लाबिंग सुरु करण्यात आली आहे. यासाठी अनेकांनी मातोश्री तर काहींनी सिल्वर ओक गाठण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या सदस्यत्वाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

राज्य विधी मंडळाच्या विधानसभेच्या मतदानातून विधान परिषदेवर गेलेल्या ९ सदस्यांची मुदत येत्या २४ एप्रिलला संपत आहे. यात काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी आणि भाजपच्या तीन आणि शिवसेनेतील एका जागेचा समावेश आहे. त्याशिवाय नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. परंतु विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून होणाऱ्या निवडीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. यात बहुतांश ज्यांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळाली नाही. त्यांनी आपली वर्णी लावण्यासाठी आता मातोश्री आणि सिल्वर ओकच्या दिशेने पाऊले वळविली आहेत. एकीकडे भाजप विधानसभेत सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष असला तरी महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने विधान परिषदेत नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच विधानपरिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने निवडणूक झाल्यास मतांसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी आतापासून तयारी सुरु केली आहे.

विधानसभेतून निवडून देणाऱ्या सदस्यांप्रमाणे जून महिन्यात १२ राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची मुदत संपत आहे. विधानपरिषदेवर कला, साहित्य, शिक्षण आदी क्षेत्रातील व्यक्ती राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नेमण्याची तरतूद आहे. यासाठी देखील अनेकांनी आतापासूनच लाबिंग सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात विद्यापीठांच्या माजी कुलगुरुंनी देखील यासाठी प्रयत्न सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

विधानपरिषदेतून विधानसभा सदस्यांद्वारे निवडून गेलेले आणि निवृत्त होणारे सदस्य

काँग्रेस : चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड
राष्ट्रवादी : हेमंत टकले, आनंद ठाकुर, किरण पावसकर
भाजप : पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ, अरूण अडसड
शिवसेना : डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यपाल नामनियुक्त सदस्य

काँग्रेस : हुस्नबानू खलिफे, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील, रामहरी रूपनवर

राष्ट्रवादी काँग्रेस : प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे (राहुल नार्वेकर, रामराव वडकुते यांनी राज्यपाल नामनियुक्त सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.)

आरपीआय : जोगेंद्र कवाडे

पदवीधर मतदारसंघ

सतीश चव्हाण (औरंगाबाद),
अनिल सोले (नागपूर)
(चंद्रकांत पाटील विधानसभेवर गेल्याने पुणे पदवीधरची जागा रिक्त आहे)

शिक्षक मतदारसंघ

श्रीकांत देशपांडे (अमरावती), दत्तात्रय सावंत (पुणे)

First Published on: February 3, 2020 9:02 PM
Exit mobile version