जेएसडब्ल्यूच्या वाहतुकीमुळे स्थानिक नागरिक मेटाकुटीस

जेएसडब्ल्यूच्या वाहतुकीमुळे स्थानिक नागरिक मेटाकुटीस

येथील रेल्वे स्टेशन यार्डात पुन्हा एकदा जेएसडब्ल्यू कंपनीला लागणार्‍या कच्च्या लोखंडी मालाची वाहतूक सुरू झाली असून त्याचा त्रास धामणसई पंचक्रोशीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. याच वर्षी धामणसईकडे जाण्यार्‍या रस्त्याचा इतर मार्गाचा दर्जा काढून त्याचा प्रमुख जिल्हा मार्गात समावेश करण्यात आला. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या कामासाठी 75 लाखांचा निधी मंजूर केल्यानंतर या कामाची सुरूवात झाली. त्यामुळे आता हा तीन किलोमीटर लांबीचा सुसज्ज रस्ता स्थानिकांना उपलब्ध झाला आहे. पावसाळ्यात यापूर्वी होणारी गैरसोय दूर होणार असे वाटत असताना शेजारच्या रेल्वे स्टेशन यार्डात जेएसडब्ल्यू कंपनीच्या कच्च्या लोखंडी मालाची वाहतूक सुरू झाली आहे. या वाहतुकीमुळे रेल्वे स्टेशन ते डॉ. चिंतामणराव देशमुख महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे व चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसत आहे.

यामुळे येथून जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मालाची वाहतूक करताना संबंधित ठेकेदार व रेल्वे मालामाल होत असली तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली जाताना दिसत नाही. नागरिकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता या मार्गावरील चिखल हटवावा व मोठे खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी धामणसई विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाराम कोकले व इतरांनी केली आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर धामणसई पंचक्रोशी आहे. या भागात धामणसईसह सोनगाव, गावठाण, मुठवली, माळसई, इंदरदेव या गावांसह लगतच्या आदिवासीवाड्या-वस्त्या आहेत.

First Published on: June 25, 2019 4:13 AM
Exit mobile version