चौथ्या लॉकडाउनसाठी राज्यात निमलष्करी दल

चौथ्या लॉकडाउनसाठी राज्यात निमलष्करी दल

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सोमवारी संपुष्टात येणारा लॉकडाऊन३१ मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २२ मार्च पासून १७ मे पर्यंत लॉकडाऊनचे तीन टप्पे पूर्ण झाले असून चौथा लॉकडाऊन १८ मे ते ३१ मे पर्यंत लागू राहणार आहे. लॉकडाऊन दरम्यान राज्यभरात पोलिसांवर झालेले हल्ले लक्षात घेऊन चौथ्या लॉकडाऊनच्या काळात निमलष्करी दलांना पोलिसांच्या मदतीसाठी तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या नऊ तुकड्या महाराष्ट्र दाखल झाल्या असून आणखी एक तुकडी उद्या दाखल होणार आहे. तसेच होमगार्डच्या पथकांचीही मदत घेतली जाणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद आणि नागपूर या महानगरांमधील रेड झोन तसेच कंटेनमेंट झोनमध्ये ही निमलष्करी दले तैनात करण्यात येणार आहेत. ३१ मे पर्यंत वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनचे आदेश राज्य शासनाचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी जारी केले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने ट्वीटद्वारे या आदेशाची प्रत प्रसारित करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने जाहीर केलेला तिसरा लॉकडाऊन रविवारी संपला. १८ मे पासून ते ३१ मे पर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, या चौथ्या लॉकडाऊनचे स्वरूप वेगळे असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचित केले होते. केंद्र शासनाचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच राज्य शासनाने लॉकडाऊनची मुदत वाढवल्याचा आदेश काढला आहे. राज्यातील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याचे स्वरूप राज्य सरकार स्पष्ट करतील असेही सांगितले होते. त्यामुळे या चौथ्या टप्प्याच्या लॉकडाऊनचे निकष राज्य सरकार अंतिम करणार आहे. ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन नुसार विविध क्षेत्रांत सूट दिली जाणार आहे. कोणत्या झोनमध्ये किती आणि कोणत्या गोष्टींना सूट दिली जाणार त्याची नियमावली शासनाकडून स्पष्ट केली जाणार आहे.

First Published on: May 18, 2020 7:14 AM
Exit mobile version