‘विद्यार्थ्यांना थेट बारावीच्या वर्गात पाठवा’ – शिक्षकांची मागणी

‘विद्यार्थ्यांना थेट बारावीच्या वर्गात पाठवा’ – शिक्षकांची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववी, दहावी आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु अकरावीच्या प्रथम सत्रात झालेल्या परीक्षांच्या गुणांच्या आधारे निकाल लावल्यास विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे अकरावीत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बारावीत थेट प्रवेश द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र नववी व अकरावीच्या दुस-या सत्रातील परीक्षा न घेता, पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या, प्रात्यक्षिके आणि अंतर्गत मुल्यमापण करून विद्यार्थ्यांची वर्गोन्नती करून त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामधील अकरावीच्या निर्णयाला शिक्षक संघटनेने विरोध दर्शविला आहे.

यंदा अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबली होती. सप्टेंबरमध्ये त्यांचे वर्ग सुरू झाले. लगेच गणपती व पाठोपाठ दिवाळीची सुट्टी आली. यावर्षी इयत्ता अकरावीचा अभ्यासक्रम बदलला, नवीन पाठ्यपुस्तके असतानाही शिक्षकांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले नाही.  विद्यार्थ्यांना फारसे न शिकताच पहिली सत्र परीक्षा यंदा घ्यावी लागली, त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर झाला असल्याचे निरीक्षण महासंघाने नोंदविले आहे.

दुसऱ्या सत्रात अकरावीचे विद्यार्थी खऱ्या अर्थाने शिकू लागतात. व त्यानंतर होणाऱ्या  परीक्षांमध्ये ते चांगले गुण मिळवतात. अखेरीस सरासरीने ते बारावीत जातात. अकरावीत नापास झालेले विद्यार्थी बारावीसाठी महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत नाहीत परंतु बाह्य विद्यार्थी म्हणून राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या  परीक्षेला बसतात. त्यासाठी शिक्षण मंडळ प्रचंड फी घेते, विद्यार्थी बाहेर शिकवण्या लावतात, यासाठी भरपूर पैसा खर्च होतो. शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय हा विद्यार्थी व पालकांना खूप खर्चात टाकणारा आहे. शिक्षणमंडळाला व शिकवणीवर्गांना प्रचंड उत्पन्न मिळवून देणारा आहे. विद्यार्थ्यांना अकरावीत नापास करणे शिकवणी वर्ग चालवणाऱ्या व शिक्षण मंडळाच्या हिताचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपल्या निर्णयाचा फेरविचार करून यंदा अकरावीत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश द्यावा, अशी विनंती ही आंधळकर यांनी केली आहे.

First Published on: April 13, 2020 8:29 PM
Exit mobile version