Lockdown : लॉकडाउनचा कालावधी क्रीडा क्षेत्रासाठी अयोग्य काळ!

Lockdown : लॉकडाउनचा कालावधी क्रीडा क्षेत्रासाठी अयोग्य काळ!

कोरोना विषाणू संसर्गामुळे क्रिकेट सामने, मैदाने, अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक आणि बंदिस्त कोर्ट बंद ठेवावी लागली असली तरी क्रीडाक्षेत्रासाठी हा अयोग्य काळ आहे. यावर्षी स्पर्धा आयोजित करणे म्हणजे एखाद्याच्या जीवाशी खेळणे. त्यामुळे क्रीडाक्षेत्राने काही महिने विश्रांती घेण्याची गरज आहे, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा मैदाने गजबजण्याची शक्यता आहे. पण पुढील सहा किंवा नऊ महिने कोणत्याही स्पर्धाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर्षी क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, मोटारस्पोर्ट्स शर्यती किंवा क्रीडाक्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक स्पर्धेला कोरोनाचा फटका बसला आहे.

‘‘खेळ हे दोन घटकांना जोडण्याचे काम करते, यात शंका नाही. पण सद्य:स्थितीत स्पर्धाचे आयोजन करून मोठ्या संख्येने जमाव जमवण्यापेक्षा लोकांचे प्राण वाचवणे सर्वात महत्त्वाचे आहे. स्पर्धाचे आयोजन धोकादायक ठरू शकते. काही ठिकाणी कोरोनाचा मृत्युदर जास्त आहे. क्रीडा स्पर्धा शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी महत्त्वाच्या असतात. पण अशा परिस्थितीत स्पर्धामुळे खेळाडू तसेच लोकांच्या जीवावर बेतू शकते. खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते, पण ऑलिम्पिकसारखी स्पर्धा पुढे ढकलण्याचा एकमेव पर्याय होता,’’ असे विख्यात शल्यविशारद आकाश साभरवाल यांनी सांगितले.

पुढील सहा महिने कोणत्याही स्पर्धा आयोजित करू नका

सर गंगाराम रुग्णालयाचे विख्यात क्रीडा वैद्यकतज्ज्ञ डॉ. आशीष आचार्य यांनी सांगितले की, ‘‘पुढील किमान सहा महिने कोणत्याही स्पर्धा आयोजित केल्या जाऊ नयेत. सद्य:परिस्थितीत अत्यावश्यक गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे. देशातील परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी किमान तीन ते सहा महिने स्पर्धा न भरवणे बरे आहे.’’

क्रीडा क्षेत्राला विश्रांती देणे गरजेचे

‘‘कोरोनासारख्या विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होतो, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे पुढील काही महिने क्रीडाक्षेत्राला विश्रांती दिलेलीच बरी,’’ असे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. नेहा गुप्ता यांनी सांगितले.

चाहत्यांचा सहभाग नसलेल्या स्पर्धाचे आयोजन करावे

द्वारका येथील मणिपाल रुग्णालयाचे श्वसनासंबंधी औषध विभागाचे प्रमुख डॉ. पुनित खन्ना म्हणाले की, ‘‘बहुतांश लोक आपल्या आवडत्या स्पर्धा दूरचित्रवाणीवरूनच पाहात असतात. त्यामुळे चाहत्यांचा सहभाग नसलेल्या स्पर्धाचे आयोजन करावे. मात्र, स्पर्धाचे आयोजन हे अनेकांच्या जीवावर बेतू शकते.’’

First Published on: April 16, 2020 12:40 PM
Exit mobile version