Politics : माढ्यात नवा ट्विस्ट; कारखान्यावरील कारवाईनंतर अभिजित पाटलांनी फडणवीसांची भेट अन्

Politics : माढ्यात नवा ट्विस्ट; कारखान्यावरील कारवाईनंतर अभिजित पाटलांनी फडणवीसांची भेट अन्

पुणे : राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आठवड्याभरापूर्वी शिखर बँकेने जप्तीची कारवाई केली होती. यानंतर अभिजित पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता माढ्यातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकरांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शरद पवारांसह माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. (Lok Sabha Election 2024 Abhijit Patil public support for Mahayuti candidate Ranjit Nimbalkar in Mhada)

अभिजित पाटील हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारात सोलापूरमध्ये अभिजीत पाटील सक्रिय आहेत. अशातच आठवड्याभरापूर्वी राज्य सहकारी बँकेने कारखान्याची तीन गोडाऊन सील केले. तसेच कारखान्याच्या गोडाऊनवर नोटीस चिकटवण्यात आली आहे. जुन्या संचालक मंडळाने 430 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज थकल्याचे प्रकरण पुण्याच्या डीआरटी न्यायालयात होते.

हेही वाचा – Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी हा जावईशोध कुठून लावला? शरद पवारांची टीका

न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बँकेच्या अधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल कारखान्याची साखरेची तीन गोडाऊन सील केले. सध्या शेतकऱ्यांची ऊसाची बिले द्यायची असून त्यासाठी 100 कोटींपेक्षा जास्त रकमेची आवश्यकता आहे. तसेच गोडाऊनमध्ये जवळपास 1 लाखाहून जास्त साखरेच्या पोत्यांचा समावेश आहे. असे असतानाही अभिजित पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली. भाजपाने त्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्याचाही आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत संताप व्यक्त केला. अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील ही कारवाई म्हणजे माढा मतदारसंघात लख्खपणे दिसणाऱ्या पराभवाच्या भीतीने सुरू असलेली दडपशाही आहे, असा आरोप त्यांनी केला. मात्र या सर्व घडामोडी सुरू असतानाच अभिजीत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अभिजीत पाटील आपला साखर कारखाना वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे, कोणत्याही पक्षात जायला तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं. अशातच आता त्यांनी माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकरांना पाठिंबा जाहीर केला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या पकडीमध्ये गुदमरलाय; संजय राऊतांची टीका

Edited By – Rohit Patil

First Published on: May 2, 2024 12:08 PM
Exit mobile version