Lok Sabha 2024 : रोहित पवार रडले, अन् अजित पवार नक्कल करत म्हणाले…

Lok Sabha 2024 : रोहित पवार रडले, अन् अजित पवार नक्कल करत म्हणाले…

रोहित पवार रडले, अन् अजित पवार नक्कल करत म्हणाले...

पुणे : बारामती लोकसभेसाठी आज रविवारी (ता. 05 मे) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी तर शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची लेकीसाठी म्हणजेच सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार सभा पार पडली. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण केले. तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी स्वतः त्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले. पण सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेतील भाषणात आमदार रोहित पवार यांना अश्रु अनावर झाले. पण त्यांच्या रडण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नक्कल करून दाखवली. (Lok Sabha Election 2024 Ajit Pawar imitated Rohit Pawar cry campaign meeting in Baramati)

जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही, असे पक्षफुटीनंतर शरद पवार म्हणाले होते. या प्रसंगाची आठवण करत रोहित पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात रडू कोसळले. हा प्रसंग सांगताना रोहित पवार म्हणाले की, जेव्हा पक्ष फुटला मी आणि काही कार्यकर्ते, पदाधिकारी शरद पवार यांच्याबरोबर बसलो होतो. शरद पवारांसोबत चर्चा करत होतो. शरद पवार टीव्हीकडे बघत होते. त्यांनी चेहऱ्यावर दाखवले नाही. टीव्ही बघत-बघत आम्ही काही प्रश्न केले, त्यांनी त्याचे उत्तर दिले. बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही अजिबात काळजी करु नका. आपला जो स्वाभिमानी महाराष्ट्र आहे तो आपल्याला घडवायचा आहे. तो घडवण्यासाठी आपण नवीन पिढी तयार करायची, नवीन पिढीला ताकद द्यायची. जोपर्यंत नवी पिढी ही जबाबदारी घेत नाही किंवा जबाबदारी घेण्याच्या लेव्हलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे शरद पवार यांचे शब्द आहेत, असे सांगताच प्रचारसभेच्या व्यासपीठावर रोहित पवार रडू लागले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : बारामतीत नणंद-भावजयीचा प्रचार संपला, काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला

हा प्रसंग सांगितल्यानंतर रोहित पवारांनी शरद पवारांना विनंती करत म्हटले की, साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केले ते कृपया पुन्हा करु नका. तुम्ही आमचे जीव आहात. तुम्ही आमचे आत्मा आहात, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच, काही लोकं तुम्हाला त्रास देतात, ते मोठे नेते जरी असले तरी सामान्य माणसं, आमच्यासारखे छोटेमोठे कार्यकर्ते आणि संपूर्ण पवार कुटुंब तुमच्याबरोबर आहे. साहेब आम्ही स्वार्थासाठी लढत नाहीत. कदाचित मलाही मंत्रीपद मिळू शकले असते. माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी जी कंपनी उभी केली, कुठलिही चूक नसताना त्या कंपनीवर कारवाई केली. मला माहिती होते की, मी सत्तेत गेलो असतो तर ती कारवाई झाली नसती, असेही रोहित पवारांकडून यावेळी सांगण्यात आले.

अजित पवारांनी केली रोहित पवारांची नक्कल…

एकीकडे रोहित पवार यांचे भाषण सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांची सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामतीत प्रचार सभा सुरू होती. याचवेळी त्यांनी लगेच, रोहित पवार यांच्या रडण्याचा किस्सा सांगत आणि नक्क्ल करत म्हणाले की, मित्रांनो मी तुम्हाला सांगितले होते की, शेवटच्या सभेत कोणीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवले. मग मी पण दाखवतो. अरे मला मतदान द्या. ही असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत. तुम्ही काम दाखवा. तुमचे खणखणीत नाणे दाखवा. हा झाला रडीचा डाव. हे असले नाही चालतं. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो. काही काही जण ते करणार आहेत, असा टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावला.

अजित पवारांची टीका…

रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देत अजित पवार म्हणाले की, अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट आम्ही दिली. गळ्याची आण घेऊन सांगतो, साहेब सांगत होते, अजिबाद देऊ नको. मी साहेबांचे ऐकले नाही. मी तिकीट दिले. त्यानंतर म्हणाला हडपसरला उभे राहायचे. आम्ही म्हणालो तू कर्जत जामखेडला जा, आम्ही तिथे तुला मदत करु. आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजले आहेत. तुम्ही आमच्यावर टीका करता. तुझ्यापेक्षा कितीतर उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत, असे जोरदार प्रत्युत्तर अजित पवारांकडून यावेळी देण्यात आले.

हेही वाचा… Vijay Wadettiwar : कसाब नव्हे तर पोलिसांच्या गोळीने झाला करकरेंचा मृत्यू; वडेट्टीवारांच्या विधानाने नवा वाद


Edited By : Poonam Khadtale

First Published on: May 5, 2024 7:38 PM
Exit mobile version