Lok Sabha 2024 : रत्नागिरीतील सभेतून अमित शहांचे उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले…

Lok Sabha 2024 : रत्नागिरीतील सभेतून अमित शहांचे उद्धव ठाकरेंना आव्हान, म्हणाले…

रत्नागिरीतील सभेतून अमित शहांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

News By : Premanand Bachhav

रत्नागिरी : महायुतीकडून भाजपातर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या कोकणात नारायण राणे यांच्या प्रचारार्थ जोरदार प्रचार सभा घेण्यात येत आहेत. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आज शुक्रवारी (ता. 03 मे) केंद्रीय मंत्री, भाजपा नेते अमित शहा यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी शहांनी ठाकरेंना आव्हान करत हिंमत असेल तर अयोध्येत राम मंदिर बांधले गेले ही चांगली गोष्ट झाल्याची जाहीर कबुली द्या, असे म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024 Amit Shah challenge to Uddhav Thackeray from meeting in Ratnagiri)

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारसभेत बोलताना केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले की, हिंमत असेल तर अयोध्येत राम मंदिर बांधले गेले ही चांगली गोष्ट झाल्याची जाहीर कबुली उद्धव ठाकरेंनी द्यावी. तिहेरी तलाक, कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी सहमत आहात का, हेही उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे. काँग्रेसची व्होट बँक हीच उद्धव ठाकरेंची व्होट बँक आहे हे माहीत असल्याने अशी कबुली देण्याची हिंमत ते दाखविणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : राहुल गांधींची चायनीज गॅरंटी, सांगलीतील सभेत अमित शहांचा टोला

तसेच, वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे दाखवू शकत नसतील, तर नकली शिवसेनादेखील त्यांनी चालवू नये, तिहेरी तलाक पुन्हा लागू करण्याचे आश्वासन देणाऱ्या, 370 कलम पुन्हा लागू करण्याची ग्वाही देणाऱ्या, मुस्लिम पर्सनल लॉ पुन्हा लागू करण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसचा जाहीरनामा मान्य आहे की नाही, हे जाहीर करा, मौन पाळू नका, महाराष्ट्राच्या जनतेसमोर याची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागतील. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा असा सहज मिळत नसतो, तुम्ही केवळ त्यांच्या पोटी जन्म घेतला, पण वारसा मात्र नारायण राणे, एकनाथ शिंदे, राज ठाकरे चालवत आहेत. तुम्ही त्या वारशाचा केव्हाच त्याग केलात, असा हल्लाबोल यावेळी अमित शहा यांनी केला.

उद्धव ठाकरे ज्यांच्याबरोबर जाऊन बसले आहेत, त्या सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी 70 वर्षांपासून अनाथ अपत्यासारखे 370 कलमास कवटाळले होते. 370 कलम रद्द केल्यास काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील असे राहुल गांधी म्हणाले होते. पाच वर्षे झाली. काश्मीरमध्ये रक्ताचा एक थेंबही सांडलेला नाही. मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ज्यांच्या पायाशी लोळण घेतली ते काँग्रेस व शरद पवार कलम 370 रद्द करण्यास विरोध करत होते. तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे की, कलम 370 ची पाठराखण करणारी काँग्रेस व शरद पवारांची एनसीपी पाहिजे याचे उत्तर नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे, असे म्हणत शहांनी जे शरद पवार आणि राहुल गांधींसमोर लोटांगण घालतात, ते महाराष्ट्राचा सन्मान सांभाळू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

हेही वाचा… Rahul Gandhi in Pune : राहुल गांधींची पुण्यात मोठी घोषणा; आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार

सोनिया-मनमोहन सरकारच्या काळात पाकिस्तानातून दहशतवादी येऊन बॉम्बस्फोट करून जात होते, तेव्हा काँग्रेसची वोट बँक सांभाळण्यासाठी मौनीबाबा मनमोहन सिंग दिल्लीत मौन धारण करून बसत होते. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर दहा दिवसांतच मोदींनी पाकिस्तानात घुसून आतंकवाद्यांचा नायनाट केला. छत्तीसगढमध्ये नक्षल्यांचा सफाया झाला, 29 नक्षलवादी ठार झाले, तेव्हा राहुल गांधी त्यांच्या बचावासाठी पुढे आले. ज्यांनी शेकडो निरपराधांचा जीव घेतला, त्यांचा बचाव करणाऱ्या राहुल गांधींसमोर उद्धव ठाकरे लोटांगण घालतात, ही शरमेची बाब आहे, असे टीकास्त्र रत्नागिरीतील सभेतून भाजपा नेते अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर डागले.


Edited By : Poonam Khadtale

First Published on: May 3, 2024 10:31 PM
Exit mobile version