Lok Sabha 2024 : अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांची उडवली खिल्ली, म्हणाले…

Lok Sabha 2024 : अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांची उडवली खिल्ली, म्हणाले…

अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांची उडवली खिल्ली

पुणे : शिरुर लोकसभेतून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यामुळे आता पुन्हा 2019 प्रमाणेच अमोल कोल्हे वि. आढळराव पाटील असा सामना रंगणार आहे. ज्यामुळे आता दोन्ही बाजूंसाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. (Lok Sabha Election 2024 Amol Kolhe made fun of Shivajirao Adhalarao Patil)

महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेत बुधवारी (ता. 24 एप्रिल) सभा पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते सचिन अहिर उपस्थित होते. या सभेतून विरोधी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर कोल्हेंनी जोरदार प्रहार केला. तर उमेदवारीसाठी आढळराव यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, या मुद्द्यावरून कोल्हेंनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा… Politics : उद्धव ठाकरे, पवारांचा दबाव, निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठा भूकंप; अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

भोसरी येथील सभेत बोलताना मविआचे उमेदवार अमोल कोल्हे म्हणाले की, जे उमेदवार बेडूक उड्या घेऊन आजवर ज्यांच्यावर आरोप करत होते, त्याच अजित पवारांच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटलांविषयी फार बोलणे उचित राहणार नाही. ते पहिल्या पसंतीचे उमेदवार असते तर नक्की मी आढळरावांवर भाष्य केलं असते, असा सणसणीत टोलाच कोल्हेंकडून लगावण्यात आला आहे.

आढळराव पाटील आज गुरुवारी (ता. 25 एप्रिल) शिरुर लोकसभेतून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ज्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तासांआधी कोल्हेंकडून करण्यात आलेल्या या जहरी टीकेवर आढळराव पाटील यांच्याकडून काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, अजित पवार गटात सहभागी होण्याआधी आढळराव पाटील यांच्याकडून अजित पवारांवर अनेकदा टीका करण्यात आली आहे. परंतु, उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या शिवाजीरावांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली.

छगन भुजबळ असते शिरुरचे उमेदवार…

या सभेतून मविआचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. महायुतीत शिरुर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटण्याचा निर्णय झाल्यानंतर या जागेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार होते. महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हा प्रस्ताव सुचवला होता. पण भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर अन शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली, असा दावा अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला; आता छुप्प्या प्रचारावर उमेदवारांचा भर


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 25, 2024 10:11 AM
Exit mobile version