Lok Sabha Election 2024 : शहा-योगींनी कोकणात येऊ नये, अन्यथा…; भास्कर जाधवांचा इशारा

Lok Sabha Election 2024 : शहा-योगींनी कोकणात येऊ नये, अन्यथा…; भास्कर जाधवांचा इशारा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणूक 2024साठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भाजपने या मतदारसंघात जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोकणात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, योगी-शहा यांच्या कोकण दौऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी टीकास्त्र सोडले आहे. अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये, अन्यथा येथील जनता त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत भास्कर जाधवांनी टीका केली आहे. (Lok Sabha Election 2024 Bhaskar Jadhav Warns BJP Leaders Amit Shah Yogi Adityanath Over Konkan Rally For Narayan Rane)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भाष्य करताना भास्कर जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. “खाशाबा जाधव एवढेसे होते. त्यांच्यासमोर भलेमोठे परदेशी पैलवान होते. मात्र, त्यांनी या पैलवांनाना पराभूत करून सुवर्णपदक मिळवले. आमचे विनायक राऊतही तसेच आहेत. मी आज अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना सांगतो की तुम्ही कोकणात येण्याच्या भानगडीत पडू नका. इथे आलात तर कोकणातील जनता तुम्हाला कोकणच्या मातीचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला.

हेही वाचा – Lok Sabha 2024: सहानुभूतीची लाट हा माझ्या तोंडात घातलेला शब्द; भुजबळांचा यू- टर्न

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ही शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप यांच्यात होणार आहे. त्यानुसार, भाजप उमेदवार नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गट उमेवार विनायक राऊत अशी लढत होणार आहे. विशेष म्हणजे विनायक राऊत आणि नारायण राणे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे भास्कर जाधवांच्या टीकेनंतर भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोकणातील अनेक प्रश्न प्रलंबित असून हे प्रश्न सोडवण्यासाठी या दोन्ही उमेदवारांकडून मतदारांना आश्वासने दिली जात आहेत. मात्र, कोकणातील मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे, विनायक राऊत यांनी या मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. आता सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून ते विजयाची हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत.


हेही वाचा – LOK SABHA 2024: फडणवीस आणि अजित पवार गावागावात धमक्या देतायत; संजय राऊतांचा आरोप

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 28, 2024 2:35 PM
Exit mobile version