Lok Sabha 2024 : राजन विचारे 8 वर्ष गायब, ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय पक्का; मनसेचा टोला

Lok Sabha 2024 : राजन विचारे 8 वर्ष गायब, ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय पक्का; मनसेचा टोला

ठाणे : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, कल्याणमधुन श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यात नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मनसेकडून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. (Lok Sabha Election 2024 Constituency Naresh Mhaske will win in Thane MNS Avinash Jadhav Slams Rajan Vichare)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अविनाश जाधव यांनी महाविकास आघाडीचे ठाण्यातील उमेदवार राजन विचारे यांच्यावर टीका केली आहे. “नरेश म्हस्के यांचा ठाण्यातून विजय खूप सोपा आहे. भाजपाचे नगरसेवक, मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असलेला हा भाग आहे. मागील 10 वर्षाचा राजन विचारेंचा कार्यकाळ पाहिला तर मागच्या 2 वर्षात ते दिसायला लागले, पहिले 8 वर्ष आम्हाला खासदार शोधावे लागत होते. त्यामुळे ही लढाई कठीण असेल असं वाटत नाही. मनसेची 2 लाख मते या मतदारसंघात आहेत. मागच्या विधानसभेची आकडेवारी पाहिली तर 2 लाखाच्या आसपास मनसेचं मतदान आहे. त्यामुळे मनसेच्या मतांवर नरेश म्हस्के ठाण्यातून निवडून येतील”, असं म्हणत अविनाथ जाधव यांनी राजन विचारे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

याशिवाय, प्रचार किती केला हे महत्त्वाचे नाही. अनेकजण 2 वर्ष प्रचार करूनही पडतात. तुल्यबळ काय हे आपण पाहिले पाहिजे. ठाण्यात भाजपा-शिवसेना प्रचंड ताकदीने आहे. त्यासोबत मनसेची 2 लाख मते ही महायुतीच्या बाजूने आहेत. त्यामुळे ठाण्यातील विजय एकतर्फी वाटतो. 4 जूनला महायुतीचे सरकार या देशात असेल”, असेही अविनाश जाधव यांनी म्हटले.

“लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे आणि कल्याणचे उमेदवार शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले. मात्र, पालघरच्या जागेचा तिढा अद्यार कायम आहे. परंतू, पालघरच्या बाबतीत लवकर निर्णय झाला पाहिजे, इतर पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेत, तिथल्या स्थानिक शिवसेनेच्या खासदारांवर लोकांची नाराजी आहे. परंतु याबाबत आज निर्णय होईल. पालघरमध्ये जो कुणी महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत मनसे काम करेल. भाजपा-शिवसेना-मनसे हे ताकदीने पालघरमध्ये प्रचारात उतरणार आहेत. त्यामुळे ठाणे, पालघर जिल्ह्यातील चारही जागांमध्ये महायुती जिंकेल असा” दावाही मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.


हेही वाचा – 2 -3 लाखाच्या मताधिक्यांनी यश मिळेल; उमेदवारी मिळाल्यावर हेमंत गोडसेंकडून विश्वास व्यक्त

Edited By -Vaibhav Patil

First Published on: May 1, 2024 3:48 PM
Exit mobile version