Lok Sabha 2024: नरेंद्र मोदींचा कालखंड हानीकारक; पुन्हा सत्ता मागण्याचा…; शरद पवारांचा हल्लाबोल

Lok Sabha 2024: नरेंद्र मोदींचा कालखंड हानीकारक; पुन्हा सत्ता मागण्याचा…; शरद पवारांचा हल्लाबोल

देशाचा मूड हा मोदीविरोधी आहे - शरद पवार

सातारा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कालखंड देशासाठी हानीकारक ठरला. त्यामुळे आता पुन्हा एकदा सत्ता मागण्याचा त्यांना अधिकार नाही, असा थेट निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी साधला आहे. आज पाटण येथील जाहीर सभेत ते बोलत होते. (Lok Sabha Election 2024 NCP leader Sharad Pawar Criticized Narendra Modi s at Satara)

यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मविआचे मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेस माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, उमेदवार आमदार शशिकांत शिंदे, आमदार अरुण लाड, सत्यजीतसिंह पाटणकर, सारंग पाटील, शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, हिंदूराव पाटली, दीपक पवार, राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान टीका-टीप्पणीत व्यस्त

पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी पदाची गरिमा राखू शकले नाहीत. सध्याचे केंद्र व राज्य सरकार हे आत्मकेंद्री आहे. आपल्या मतलबासाठी सरकार चालवत आहेत. ही निवडणूक प्रामुख्याने प्रचंड महागाई, बेरोजगारी, जातीयवाद या प्रमुख मुद्यांवर होत असल्याने याचा सर्वसामान्य मतदारांनी गांभीर्याने विचार करणं गरजेचे आहे.

या महागाईत महिला घर तर सर्वसामान्य जनता वाहने चालवू शकत नाहीत. सन 2014 च्या तुलनेत आज प्रचंड महागाई वाढली आहे. देशातील 87 टक्के तरुण बरोजगार आहेत. जातीयवाद, धार्मिकता यावरच आज हा देश चालवला जात आहे.

आजचे पंतप्रधान राहुल गांधी, गांधी घराणे व नेहरुंच्यावर टीकाटिप्पणी करण्यात मश्गूल आहेत. ज्या माणसांनी व कुटुंबाने आपल्या स्वातंत्र्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली, दुर्दैवाने त्यांच्यावरच टीका, टिंगलटवाळी करणे हे या देशातल्या जनतेला कधीही मान्य होणार नाही, असं शरद पवार म्हणाले. देश नक्की कोणत्या हातात द्यायचा हे ठरवणारी येणारी लोकसभेची निवडणूक असल्याने निश्चितच सातारा जिल्हाच नव्हे तर राज्य व देशातही परिवर्तन अपेक्षित आहे. या अपेक्षित परिवर्तनामध्ये शशिकांत शिंदे यांच्यासारख्या एका अभ्यासू, परखड व्यक्तिमत्त्वाला संसदेत बहुमताने पाठवा, असं आवाहन पवारांनी केलं आहे.

उदयनराजेंना टोला

सातरा जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हा यांच्या विचारांची परंपरा असून, आता निवडणूक काळात यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची आठवण होतं आहे. ही आनंदाची बाब आहे, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली आहे. यशवंतरावांचे विचार जर जोपासायचे असतील तर या मतदारसंघातून मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनाच संसदेत पाठवा, असं आवाहनही त्यांनी सातारकरांना केलं.

(हेही वाचा: Lok Sabha 2024: सहानुभूतीची लाट हा माझ्या तोंडात घातलेला शब्द; भुजबळांचा यू- टर्न)


Edited By- Prajakta Parab

First Published on: April 28, 2024 5:06 PM
Exit mobile version